पुण्यात राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार घेणार मोठा निर्णय?

Sharad Pawar

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरू झालेल्या सत्तास्थापनेच्या राजकीय रणधुमाळीत सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार केंद्रस्थानी आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे .

या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यानंतर आता शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची दुपारी ४ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत .शरद पवार दोन दिवसांच्या नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध घटकांची भेट घेतली.

स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस बाळासाहेबांनी उभा केला : शरद पवार

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी अनौपचारिक चर्चेदरम्यान रविवार, १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन करावे, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला. यावर ‘दोन दिवसांत सरकार स्थापन करणे अवघड आहे. त्यासाठी भरपूर वेळ लागेल, घाईने काही सांगता येणार नाही’ अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडल्याचे कळते. मुंबईत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू होतं.

या बैठकीमध्ये सरकार स्थापन झाल्यावर समसमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी या मसुद्याबद्दल समाधान व्यक्त केलं होतं. त्यानंतर हा मसुदा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांकडे पाठवण्यात येईल आणि त्यावर अखेर शिक्कामोर्तब होईल, असं सांगण्यात आलं. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सर्वच प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेत अपयश आल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.