पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्त्यांची गर्दी उसळली

Sharad Pawar

बारामती : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आणि दिवाळीनिमित्त बारामतीमध्ये गोविंद बागेत पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती . यावेळी गोविंद बागेत शरद पवार, अजित पवार ,सुप्रिया सुळे, रोहित पवार ,जय पवार ,पार्थ पवार उपस्थित होते.

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना युतीला वर्चस्व मिळालं आहे. मात्र, भाजप आणि शिवसेनेच्या जागा यंदाच्या निवडणुकीत घटल्या आहेत. तुलनेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगले यश संपादन केले .

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेते बारामतीत दाखल झाले आहेत . निवडणुकीमध्ये विक्रमी मतदान मिळाल्यानंतर अजित पवार बारामतीत आले आहेत. शरद पवारांमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला संजीवनी मिळाली.

शरद पवारांच्या पावसातल्या झंझावाती सभेनं निवडणुकीचं चित्रच पालटलं. पाऊस आणि पवारांनी सत्ताधाऱ्यांचा उधळलेला वारू अडवला.

दरम्यान सातारा जिंकण्यासाठी शरद पवारांनी शेवटच्या टप्प्यात साताऱ्यात जंगी सभा घेतली. विशेष म्हणजे पवार भाषणासाठी उभे राहताच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पवारांच्या भाषणावर पाणी पडणार, असे सर्वांना वाटत होते. मात्र पवारांनी पावसाची पर्वा केली नाही. भरपावसात त्यांनी फटकेबाजी सुरू केली. उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली ही माझी चूक होती, असे सांगतानाच ही चूक सुधारण्यासाठी सगळेच सातारकर २१ तारखेची वाट पाहात आहेत, असे पवार म्हणाले. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला साक्षात वरुणराजाने आशीर्वाद दिले आहेत आणि त्या आशीर्वादाच्या बळावर सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला होता .