महाराष्ट्राने देशाला दिशा द्यावी…

Shailendra Paranjapeपुणे शहरातला करोना अटोक्यात येऊ लागला असला तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र करोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी सांगितलं की करोनाची दुसरी लाट आता अटोक्यात येत आहे आणि राज्य सरकार तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी करत आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह पुणे जिल्ह्याच्या तेराही तालुक्यात प्रत्येकी एक बालरोग विभाग सुरू करायच्या सूचनाही त्यांनी केल्यात. तिसऱ्या लाटेमधे लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना करोनाचा धोका जास्ती असण्याची शक्यत वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारनंही बालरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचं सत्रं उद्या रविवारी ठेवलं आहे.

बालरोगतज्ज्ञांच्या सत्राचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे व्हाट्स अप युनिव्हर्सिटीवर आभासी तज्ज्ञांचे पेव फुटलेले आहे. त्यामुळे बालरोगतज्ज्ञ आणि राज्याचा करोना (Corona) टास्क फोर्स किंवा कृती दलाचे तज्ज्ञ काय सांगतात, हे नीटपणे ऐकल्यास, समजून घेतल्यास व्हाट्स अप विद्यापीठातल्या आभासी तज्ज्ञांच्या अवैज्ञानिक फॉरवर्डसचा समाचार तुम्हाला घेता येईल. टू मच ऑफ इन्फर्मेशन किंवा अतिमाहितीचे दुष्परिणाम आपण सारे सध्या भोगत आहोत. त्यामुळे ज्यांना घरातला एकही सदस्य विचारत नाही, भाजी कोणती करावी, हेही ज्यांना विचारून ठरवलं जात नाही, ते लोक व्हाट्स अपवरून साऱ्या जगाला शिकवण देताना दिसतात. त्यामुळे बालरोगतज्ज्ञांचे दुपारी बारा वाजता होणारे सत्र नक्की बघा आणि आपापल्या व्हाट्स अप ग्रुपमधले गैरसमजही दूर करा.

प्लाझ्मा थेरपी वास्तविक आयसीएमआर म्हणजे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने मान्यता दिलेली उपचार पद्धती होती. अर्थात प्लाझ्मा करोनाच्या कोणत्या रुग्णाला कोणत्या स्टेजला द्यायला हवा, हे त्या त्या ठिकाणच्या डॉक्टराच्या निदानक्षमतेवर आणि निर्णय क्षमतेवर असल्याने गेले वर्षभर प्लाझ्मा उपचार आणि करोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान करावे, यासाठी विशेष मोहिमा घेण्यात आल्या. अगदी राज्य सरकारनंही तशी मोहीम चालवली. पण मागच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या करोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक तसेच कृती दलामधील तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी निःसंदिग्धपणे सांगितलं की प्लाझ्माचा करोना रुग्णाला काहीही उपयोग होत नाही. महाराष्ट्राच्या कृती दलाने याबद्दल जाहीरपणे सांगितल्यानंतर दोनच दिवसांनी केंद्र सरकारने प्लाझ्मा थेरपी करू नये आणि त्याचा उपयोग होत नाही, असे निर्देश जारी केले.

महाराष्ट्र कायमच देशाला दिशा देत आला आहे. पुण्यामुंबईतल्या करोना रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्राला बदलौकिक प्राप्त झाला पण आता करोना अटोक्यात आणण्यासंदर्भात महाराष्ट्राने देशासमोर आदर्श निर्माण करायला हवा. त्याबरोबरच संभाव्य तिसऱ्या करोना लाटेच्या वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रभावीपणे वापर करून महाराष्ट्रात रुग्णसंख्या किमान असेल आणि महाराष्ट् हे करोना नियंत्रणात आणि करोना रोखण्यातही लीडर स्टेट असेल, हे सिद्ध करायची वेळ आली आहे.

थोडेसे सकारात्मक…

मधुकर आणि वंदना सरवदे हे शिक्षक पती-पत्नी. करोना काळात अवतीभोवतीची परिस्थिती बघून त्यांच्या मनात विचार आला की सामान्य माणसांच्या नोकऱ्या रोजगार करोना काळात बुडताहेत. तर आपल्याला नेहमी दिसणाऱ्या अंध भिक्षेकरी आणि रस्त्यावर पथारीवाल्यांची कामं करणाऱ्या अंध बांधवांचं काय होत असेल. या दाम्पत्यानं दोन संस्थांच्या मदतीने निगडी भागातल्या दोनशे अंध बांधवांना विविध स्वरूपाची मदत कराला सुरुवात केली. तांदूळ, डाळ असा शिधा देतानाच जेवणाची पाकिटे, सँनेटाझर, मास्क हेही त्यांनी पुरवले आणि हे सर्व वापरण्याची निकडही समजावून सांगितली. सरवदे पती-पत्नींनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे आणि शिक्षकच समाज घडवू शकतो, हेही सिद्ध केले आहे.

शुभवर्तमान

करोनाची दुसरी लाट अटोक्यात येण्याच्या बातमीबरोबरच मान्सूस अंदमानात दाखल होत असल्याचे शुभवर्तमानही धडकले आहे. त्यामुळे मान्सूनच्य् आगमनाबरोबर सारी सृष्टी हिरवाई धारण करेल आणि नवसृजनाचे वारे वाहू लागतील. करोना जाईल आणि पुन्हा सारं काही पहिल्यासारखं होईल, ही आशा बाळगू यात..

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button