नियती उद्या चालून हिशेब तर चुकता करणार नाही ना ??

fadanvis-pawar-supriyasule

परवा एक माजी आमदार मंत्रालयात भेटले. काय होणार तुमच्या जिल्ह्यात? घड्याळ येणार की धनुष्य असं त्यांना विचारलं. ते म्हणाले, लढाई घासून झाली. कोणीही येईल पण पंधरा वीस हजाराच्या फरकाने. खूप टफ फाईट आहे. ही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे अंदाज बांधण्याकरता वापरण्यात येत असलेली परवलीची वाक्ये बनली आहेत. मग त्या माजी आमदारांनी मला माझा अंदाज विचारला. मी पण त्यांना काही आडाखे सांगितले. ते म्हणाले अंदाजबिंदाज जाऊ द्यात. 23 मे रोजी निकालात सगळं काही स्पष्ट होईलच. पण पवार साहेबांना हल्ली काय झालं आहे काही कळत नाही. गेली चाळीस वर्षे मी राजकारणात आहे. पवार साहेबांचे राजकारण मी जवळून बघितले. अतिशय तोलून-मापून बोलणारा संतुलित नेता अशी त्यांची प्रतिमा माझ्या मनात आहे. पण अलीकडे ते त्यांच्या आजवरच्या वाटचालीला तडा जाईल अशा पद्धतीने बोलत सुटले आहेत. ते माजी आमदार असेही म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस हुशार आहेत. फडणवीस हे कच्चे लिंबू आहेत असे सुरुवातीला वाटले होते पण त्यांनी इतरांना कच्चे लिंबू ठरवले. पवारसाहेब महाराष्ट्राच्या राजकारणात कोण्या एका व्यक्तीपासून सर्वाधिक त्रस्त असतील तर ते नाव आहे देवेंद्र फडणवीस. हे मी नाही ते माजी आमदार सांगत होते.

ही बातमी पण वाचा : उद्या जाहीर होणार एक्झिट पोल

राष्ट्रवादीची राज्यातील सर्वात निश्चित निवडून येणारी जागा कोणती असे कालपर्यंत कोणी विचारले असते तर शंभर पैकी शंभर लोकांचे उत्तर बारामती असे आले असते. पण आज 75 लोकांचे उत्तर राष्ट्रवादी तर 25 लोकांचे उत्तर भाजप असे येत आहे. सुप्रियाताई बारामतीतून हरतील ही जी काही शंका निर्माण झाली आहे त्या शंकेला स्वतः पवार साहेबांनी खतपाणी घातले. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी ते असे बोलले की बारामतीतून सुप्रिया हरली तर ईव्हीएमवरील लोकांचा विश्वास उडेल. त्यातूनच मग सुप्रियाताईंच्या विजयाबाबत स्वतः पवार साहेबांना शंका आहे अशी चर्चा सुरू झाली.

पवार साहेबांनी इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर यानिमित्ताने भले मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुप्रियाताईंनीदेखील वडिलांची री ओढली आणि ईव्हीएम बाबत शंका बोलून दाखवली. मात्र त्याच वेळी पवारसाहेबांचे पुतणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचे वारसदार अजित पवार यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करणे शक्य नाही असे प्रमाणपत्र दिले. यानिमित्ताने पवार यांच्या कुटुंबात ईव्हीएमबाबत असलेली मतभिन्नता ठळकपणे समोर आली.

ही बातमी पण वाचा : मोदींना गरज लागली तरच दिल्लीत ‘वाघां’ची डरकाळी

पवारसाहेबांनी आधी माढामधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला होता.त्या संदर्भात त्यांनी गाठीभेटी देखील सुरू केल्या होत्या, पण अचानक त्यांनी यू टर्न घेतला निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. त्याऐवजी अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना मावळमधून राष्ट्रवादीतर्फे उभे करण्यात आले. तेव्हा पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली होती. ती बरीच गाजली. पवार साहेबांनी निवडणूक लढण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा असे आर्जव त्या पोस्टमध्ये होते. पवार साहेबांना ज्या पद्धतीने माघार घ्यावी लागली त्यावरून रोहित यांची नाराजी लपून राहिली नव्हती. माढामधून मी न लढण्याचा निर्णय हा आमच्या कुटुंबाने एकत्रितपणे घेतला आहे असे पवारसाहेब बोलले होते. पण त्यानंतर दोनच दिवसात रोहित यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्वतःचे मन खुले केले.

माढामधून पवारसाहेबांनी निवडणूक लढण्याचा विषय असो की ईव्हीएमबाबत पवार कुटुंबातील मतभिन्नता असो या घराण्यामध्ये पुढे चालून एक वाक्यता राहील का अशी शंका पवार यांच्या हितचिंतकांना देखील थोड्या प्रमाणात का होईना पण सध्या सतावत असावी. महाराष्ट्रामध्ये राजकारणात घराणेशाहीची परंपरा आहे.अनेक घराण्यांनी या ठिकाणी राजकारण गाजवले. अनेक घराणी फुटलीदेखील.त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही घर होते. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे घर तर पवारांनी फोडले. मुंडे यांचे पुतणे धनंजय यांना ते राष्ट्रवादीत घेऊन गेले. एकेकाळी पवार साहेबांनी अशी जी फोडाफोडी केली त्याचा हिशेब नियती उद्या चालून चुकता तर करणार नाही ना अशी शंका या हितचिंतकांना येणे साहजिक आहे.

कोणत्याही परिस्थितीत आम्ही बारामती आणि मावळ जिंकणारच असे राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते म्हणत आहेत. मात्र भाजपचे नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही जागा भाजप व शिवसेना 100 टक्के जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. दादांचे वाक्य 100 टक्के खोटे ठरते की 50 टक्के खोटे ठरते की 100 टक्के खरे ठरते याबाबत अर्थातच उत्सुकता आहे. 23 तारखेला बारामती, मावळमध्ये नेमका काय निकाल लागतो आणि त्या निकालाचे पवारांच्या घराण्यावर काय परिणाम होतात हा उत्सुकतेचा विषय असेल.