महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद;, दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद

Maha-Karna

मुंबई : ‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला’, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले होते. यानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आता कर्नाटकात ‘कन्नड वेदिका संघटने’नेही महाराष्ट्राविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. वातावरण तापू लागल्याने दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने दक्षतेचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद केली आहे.

बससेवा बंद झाल्याने दोन्ही राज्यातील प्रवाशी कोल्हापूर, कागल, निपाणी,बेळगाव व इतर बस स्थानकांमध्ये अडकलेत. दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणे सुरू आहे. आज बेळगाव येथे चंदगडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजेश पाटील यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत आणि समस्त बेळगावकर सीमावासियांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. अनगोळ येथे आदर्श मल्टिपर्पज सोसायटी सभागृहात दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेला हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा कन्नड वेदिका संघटनेने दिला आहे.

रोहिंग्यांवरील अत्याचार; संराचा म्यानमारविरोधात ठराव

भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी, ‘कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसे, याचे उदाहरण घालून देऊ’ असा इशारा दिला होता.

खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचे निर्देशही पोलिसांनी परिवहन महामंडळाला दिले आहेत. प्रवासी खाजगी, शेअर वाहतुकीचा मार्ग शोधत आहेत.

दोन्ही राज्यातील निदर्शक आपली भूमिका मांडत रस्त्यावर उतरत आहेत. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा काल संध्याकाळी जाळण्यात आला. त्याची प्रतिक्रिया लगोलग कोल्हापूर येथे उमटली. युवासेनेचे जिल्हा अधिकारी हर्षल सुर्वे आणि सहकाऱ्यांनी काल रात्री कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या पुतळ्यावर काळी शाई फेकत जोडे मारो आंदोलन केले. आज, रविवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेकडून बस स्थानकापासून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.