महाराष्ट्र अजून कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही : राजेश टोपे

Rajesh Tope

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११३५ झाली आहे. मात्र महाराष्ट्र अजून कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही, असा दिलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.

आतापर्यंत ११७ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. येत्या काळात अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’ काटेकोरपणे पाळा, असे टोपेंनी सांगितले.

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक तालुक्यात रक्षक हॉस्पिटल सुरू करण्यात येत असून मोठ्या शहरात मोबाईल क्लिनिक निर्माण करणार आहे. कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारांत सुसूत्रता यावी यासाठी, लक्षणांनुसार विभागणी करण्यात येत आहे. कोरोनाची तीव्र लक्षणे असणारे रुग्ण तसेच सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार करण्यात येणार आहेत. मुंबईत कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर मुंबई इस्पितळ, लीलावती, पोद्दार, साई हॉस्पिटल (धारावी) आणि सुश्रुता रुग्णालयात उपचार होतील तर तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर सेव्हन हिल्स, नानावटी, कस्तुरबा, सैफी या रुग्णालयांत उपचार होतील, अशी माहिती टोपे यांनी दिली.

दाट लोकवस्तीच्या भागात आता अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी धारावीत लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबईत मास्क बंधनकारक करण्यात आले आहेत. देशाच्या तुलनेत राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आजारी व्यक्तीला कोरोना झाल्यास त्याची प्रकृती वेगाने ढासळते. राज्यात अशाच रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, असे टोपे यांनी सांगितले.


Web Title : Maharashtra is not yet in third phase of corona : Rajesh Tope

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)