महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारपण नाही – अजित पवार

Ajit Pawar Maharastra Today

मुंबई :- राज्यात महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आलं. कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले आहे. कोरोनाशी लढा देत असताना विकासकामं थांबू दिली नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) वेळोवेळी निर्णय घेतले. विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. देशातील परिस्थिती सर्वांनी पाहिली आहे. मधल्या काळात राज्यात दोन वादळं येऊन गेली. या संकटाचा आघाडी सरकारने सामना केला, असं सांगतानाच संकट किती आली तरीही महाराष्ट्र कधी झुकला नाही, कधी झुकणारही नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ठणकावून सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापनदिन आहे.

या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले, आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रावर अनेक नैसर्गिक संकटं आली. महाविकास आघाडी सरकारने या संकटाशी मजबुतीने लढा दिला. यापुढेही आपल्याला आव्हानाचं रूपांतर संधीत करावं लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणाची कामं केली आहेत. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले चांगले निर्णय हे लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. महाराष्ट्रहिताची तडजोड होईल असे कोणतेही निर्णय घेणार नाही आणि घेऊ देणार नाही. शाहू-फुले-आंबेडकर विचारांनीच हे राज्य चालेल, असा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो, असं पवार म्हणाले. भाजप विचारांचे सरकार केंद्रात आले आहे. देशात सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे. शासकीय संस्था विकून टाकण्याचे काम सुरू आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभसुद्धा एकसुराने काम करत आहे.

त्यामुळे आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. पत्रकारांपासून अनेक घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाहीला झुंडशाहीचं स्वरूप देण्याचं काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. अशा वेळी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे. राष्ट्रवादीला महाराष्ट्रात १ क्रमांकाचा पक्ष कसा करता येईल हा प्रयत्न आपण करू. पवारसाहेबांचे नाव आणि राजकीय वजन आणखी मोठे करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असंही अजित पवार म्हणाले. कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावरही त्याचा परिणाम झाला आहे. यूपीए सरकार होतं तेव्हा ४०० रुपयांमध्ये सिलेंडर मिळत होते,  आज ८०० रुपये द्यावे लागत आहे, डिश टीव्ही रिचार्ज जे १०० रुपयांमध्ये येत होते, त्यासाठी ५०० रुपये मोजावे लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे, बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे, असं ते म्हणाले.

कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडीने लोकांना प्रचंड मदत केली. बेड, औषधे, अन्यधान्य आणि इतर शक्य ती मदत देण्याचं काम आपण केलं आहे. कोरोनाचं संकट दूर होईपर्यंत आपल्याला ही मदत करावी लागणार आहे, असंही ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. ओबीसी समाज, धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. पण, कोणत्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचे नाही. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच जीएसटीचा परतावा मिळावा अशी मागणी आम्ही पंतप्रधानांकडे केली आहे. त्याचबरोबर बीडच्या पीक  विमा योजना, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणीही केली आहे. त्यांनी सर्व मुद्दे ऐकून घेतले असून काम करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांना माहीत असलेला सरकारी पत्रव्यवहार उपमुख्यमंत्री कार्यालयालाही द्या; अजित पवारांची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button