मोठ्या शत्रूला कमकुवत करण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केलं – अबू आझमी

Abu Azmi And Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना – राष्ट्रवादी – कॉंग्रेस या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होण्याच्या दिशेनं वेगवान हालचाली सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेनेसोबत जाण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या आघाडीसाठी कधीही तयार होणार नाही अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र, कॉंग्रेस हायकमांडने या आघाडीसाठी संमती दिली आहे. त्यानंतर कॉंग्रेस आघाडीचे मित्रपक्ष समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनीही या आघाडीला संमती दिली आहे.

जनतेनं भाजपा आणि शिवसेनेला कौल दिला होता. परंतु, त्यांना सरकार बनवता आलं नाही. त्यामुळे भाजपाला कमकुवत करण्याच्या दृष्टीने शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल, असं मत अबू आझमी यांनी व्यक्त केलं.

आझमीम म्हमाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून देश विनाशाकडे चालला आहे. हिंदू, मुस्लीम, मंदिर-मशीद, गाय-बैल यातच अडकला आहे. संधी मिळाली तर ते पुन्हा शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतात. त्यापेक्षा किमान समान कार्यक्रमाच्या आधारे शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं कधीही चांगलं. मोठ्या शत्रूला कमकुवत करण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच कॉंग्रेस आघाडीसोबत शिवसेनेला समरस व्हावं लागेल, असंही त्यांनी सूचित केलं. त्यात त्यांचा रोख हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे होता. मुस्लीम आरक्षण, वक्फ बोर्डाशी संबंधित काही विषय भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये मार्गी लागले नव्हते; त्यावर यावेळी निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.