हजारो शेतकरी दिल्लीतील आंदोलनात भाग घेण्यासाठी निघाले

farmers On Vehicle

नाशिक : शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. २१ डिसेंबर रोजी नाशिकहून वाहनांसह निघून शेतकरी २४ तारखेला दिल्लीच्या सीमेवर पोहचतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तीन वर्षांपूर्वी किसान सभेने नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढला होता. त्याच धर्तीवर नाशिक-दिल्ली वाहन मोर्च्याचे नियोजन केले आहे.

या  मोर्च्याची  माहिती किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावित, डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे शेतकरी हरियाणा सीमेवर शहाजहानपूर येथे दिल्लीकडे जाणारा महामार्ग रोखून आंदोलनात सहभागी होतील. शिधा, पाणी, निवासाची व्यवस्था सोबत घेऊन मुक्कामाची तयारी करण्यात आली आहे. रेल्वेची सामान्य वाहतूक बंद असल्याने इच्छा असूनही शेतकऱ्यांना दिल्लीला जाता आले नव्हते.

वाहतुकीच्या अडचणींवर मात करत वाहनांनी दिल्ली गाठणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल. त्याचे अनुकरण इतर भागातील शेतकरी करतील, असा विश्वास डॉ. ढवळे यांनी व्यक्त केला. सोमवारी राज्यातील शेतकरी वाहनांद्वारे नाशिक येथे जमतील. दिल्लीला कूच करताना रिलायन्स पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाहन  मोर्च्याचा पहिला मुक्काम नाशिकपासून ९० किलोमीटर अंतरावरील चांदवड येथे आहे. २२ तारखेला धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे मोर्च्याचा दुसरा मुक्काम असेल. हा तालुका महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER