सायबर पोलिसांकडून १८ दिवसांत एकूण १३२ गुन्हे दाखल

मुंबई :-सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन  असताना राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सायबर विभागाने कडक पावले उचलली असून राज्यात ११३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी समाजमाध्यमाबाबत अधिक सतर्क राहून महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्यावतीने करण्यात येत आहे. या गुन्हेगारांना व समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर सायबर विभाग समन्वय साधून काम करत आहे.

याकरिता विभाग टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाजमाध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर अचूक लक्ष ठेवून आहे. राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ६ एप्रिल २०२० पर्यंत ११३ गुन्हे दाखल झाले आहेत.  त्यामध्ये बीड १५, पुणे ग्रामीण ११, मुंबई ९, सातारा ७, जळगाव ७ , नाशिक ग्रामीण ६ , नागपूर शहर ४ ,नाशिक शहर ४, ठाणे शहर ४, नांदेड ४, गोंदिया ३, भंडारा ३ , रत्नागिरी ३, जालना ३, परभणी २, अमरावती २, नंदूरबार २, लातूर १, नवी मुंबई १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपींनी फेसबुक किंवा व्हाट्सअँपवर पोस्ट टाकून किंवा शेअर करून त्याद्वारे कोरोना महामारीला जातीय रंग देऊन, त्याद्वारे धार्मिक तेढ व समाजात अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे.

अशाच प्रकारच्या एका गुन्ह्याची नोंद लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातदेखील करण्यात आली .सदर आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकली, ज्यामुळे त्या परिसरात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

जर आपणास कोणी अपरिचित व्यक्तीने किंवा आपण ज्या व्हाट्सअँप ग्रुप्सवर आहात त्यावर कोणी परिचित, अपरिचित व्यक्तीने असे व्हिडीओ, फोटोज, मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स ज्यामुळे धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे मेसेज पाठवत असेल तर लगेच त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये द्यावी .तसेच आपण असे व्हिडीओ, फोटोज ,मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स कोणालाही पाठवू नयेत व त्वरित काढून टाकावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलने केले आहे.