शरद पवारांनी पलटवली निवडणूक

Sharad Pawar Editorial

Badgeशरद पवार संपले’ अशीच हवा भाजपने तयार केली होती. नरेंद्र मोदींपासून तो अमित शहा, देवेंद्र फडणवीस आदी युतीचे नेते काँग्रेसला नव्हे तर शरद पवारांना टार्गेट करत होते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात पवार संपू शकत नाहीत हे पुन्हा एकदा दिसून आले. गेली ४० वर्षे राज्याचे राजकारण पवारांभोवती फिरत आहे. या निवडणुकीतही ते पवारांभोवतीच फिरले. पवारांना महायुतीला सत्तेतून घालवता आले नाही; पण भाजपची धार त्यांनी नक्कीच बोथट केली. आपल्याला जेवढे डिवचाल तेवढी आपली शक्ती वाढते हे त्यांनी दाखवून दिले.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ निकाल

२०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ४१ तर काँग्रेसच्या ४२ जागा निवडून आल्या होत्या. यावेळी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी ५० जागांच्या आत संपेल, असे सत्ताधारी म्हणत होते. ह्या दोघांच्या आघाडीच्या जागा वाढल्या आहेत. ‘अब की बार, २२० पार’ असा युतीचा नारा होता. पण युतीला २०० जागांच्या आत रोखण्यात पवार यशस्वी होताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भाजपला तडाखा आहे. पाच मंत्री आपटले आहेत.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

शरद पवार निवडणुकीत उभे नव्हते; पण ही निवडणूक पवार विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशीच लढली गेली. पवारांनी ज्या आक्रमक पद्धतीने डावपेच टाकत निवडणूक लढवली ती चाणक्याला मात देणारी आहे. १९९९ मध्ये पवारांनी काँग्रेसबाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडली. तेव्हापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत पवारांची ताकद ४० ते ६० जागांची राहिली आहे. वयाच्या ७८ व्या वर्षीही ती ताकद कमी झालेली नाही. शरद पवारांना ईडीची नोटीस आली नसती तर निकाल काही वेगळे असते. नोटीस आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले. पवारांनी मराठा अस्मितेचा मुद्दा बनवला आणि पाहता पाहता मरगळलेले विरोधक रस्त्यावर आले. चित्रच बदलले. ते तर बरे की सोनिया, प्रियंका गांधी प्रचारात फिरल्या नाहीत. राहुलबाबाने फक्त पाच सभा घेतल्या. ही एकतर्फी निवडणूक आहे असेच सारे म्हणत होते. फक्त एका आणि एका पवारने पूर्ण निवडणूक अंगावर घेऊन उलटवून दाखवली.

भाजपकडे अगदी खालपर्यंत तगडी संघटनात्मक यंत्रणा आहे, असे म्हटले जाते. साताऱ्यात राजा पडू शकतो ह्याचा वास कुणालाच कसा आला नाही हे आश्चर्य आहे. भाजप नेत्यांना फाजील आत्मविश्वास नडला असे दिसते. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीला २२० जागांवर लीड होता. मग आता अचानक हे कसे झाले? लोकांची चव कशी बदलली? ग्रामीण भागातल्या खदखदत्या असंतोषाकडे युतीचे दुर्लक्ष झाले. समाजातले वातावरण लक्षात न घेता भाजपने ३७० कलमासारखे भावनिक राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणले. मूळ स्थानिक मुद्यांवर न बोलणे भाजपला महागात पडले. दुसरी गोष्ट म्हणजे दोन काँग्रेसमधल्या नेत्यांना फोडून आणणे अंगावर आले. आयारामांमुळे बंडखोरी वाढली. तब्बल ५० बंडखोर मैदानात होते. अनेक जागी भाजपच्या बंडखोरांविरुद्ध शिवसेनेचा बंडखोर अशा लढती झाल्या. गेल्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर १२२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्या घटताना दिसत आहेत. विदर्भात राष्ट्रवादीचे फक्त एक आमदार तो म्हणजे पुसदचे मनोहर नाईक होते. यावेळी राष्ट्रवादीची ताकद mवाढली आहे. ‘मैदानात पहिलवानच नाही. कुणाशी लढायचे?’ असे फडणवीस म्हणत होते; पण तेल लावलेल्या ७८ वर्षे वयाच्या छुप्या पहिलवानाने कुस्ती हाणली. म्हटल्याप्रमाणे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतीलही; पण शिवसेनेची दादागिरी वाढलेली असेल.