
परळी : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात आणि ढोल-ताशाच्या गजरात राज्यासह देशभरात सोमवारी गणरायाचे आगमन झाले. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील परळी येथील त्यांच्या राहत्या घरी गणपती बाप्पांची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापना केली.
धनंजय मुंडेंनी मुलगी आदिश्रीसह सपत्नीक बाप्पाची आरती केली. निम्मा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे, शेतकरी संकटात आहेत, सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील संकटे, विघ्नहर्त्याने दूर करावी, असे साकडे धनंजय मुंडे यांनी बाप्पाकडे घातले. आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचे राजकारण सुरू आहे. मागील ७० वर्षांत कधी नव्हे ते मानवनिर्मित व सरकारनिर्मित महाभयानक आर्थिक संकट उभे ठाकले आहे. सरकारला हे संकट दूर करता येईल, असे वाटत नाही तर विघ्नहर्ता हे संकट दूर करेल, अशी प्रार्थना मुंडे यांनी बाप्पाला केली आहे .