धक्कादायक! राज्याचे अर्ध्यापेक्षा जास्त बजेट खर्चच केले नाही! ६३ टक्के निधी अखर्चित

ajit-pawar

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारी २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार हे ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पृष्ठभूमीवर, धक्कादायक बातमी आहे. महाराष्ट्राचे अर्ध्यापेक्षा जास्त बजेट खर्चच झालेले नाही. विकास कामांवरील ६३ टक्के निधी अखर्चित आहे. सन २०१९-२०२० या वर्षासाठीचा हा निधी प्रशासनाने खर्चच केला नाही.

चालू आर्थिक वर्ष संपायला आता जेमतेम एक महिना राहिला आहे. राज्याच्या एकूण १.६१ लाख कोटींच्या निधीपैकी १.०१ लाख कोटींची रक्कम अखर्चित आहे. महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन बजेट प्रणालीवर ही संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. निधी खर्च न झाल्याबाबत प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनीही चिंता व्यक्त केली आहे.

दोन निवडणुकांसाठी लागू करण्यात आलेली आचारसंहिता, विधानसभा निवडणुकीनंतरचे राजकीय नाट्य आणि दरम्यान लागू झालेली राष्ट्रपती राजवट या बाबींमुळे निधी खर्च होण्यावर परिणाम झाला, असे सूत्रांनी म्हटले आहे. शालेय शिक्षण विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग, ओबीसी-विमुक्त जाती विभाग, गृह विभाग यांची निधी खर्च करण्यातील कामगिरी समाधानकारक असून, गृहनिर्माण विभाग, पर्यावरण विभाग आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग हे सर्वांत पीछाडीवर आहेत, हे येथे उल्लेखनीय.

राज ठाकरेंच्या बांगलादेशी मोहिम फोल ठरली ; ताब्यात घेतलेले तिघे निघाले भारतीय