…जेंव्हा गोलंदाजाने केली फलंदाजाची धुलाई!

Keshav Maharaj
  • पोर्ट एलिझाबेथ कसोटीत घडले अघटीत
  • केशव महाराजने वसुल केल्या एकाच षटकात 28 धावा
  • जो रुटचा गोलंदाजी करण्याचा निर्णय ठरला महागडा

पोर्ट एलिझाबेथ : इंग्लंडने जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी अघटीत घडले. एका शुध्द गोलंदाजाने फलंदाजीत तडाखा दाखवताना एका यशस्वी फलंदाजाची विश्वविक्रमी धुलाई केली. दक्षाण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज याने इंग्लंडच्या जो रुटच्या एकाच षटकात तब्बल 28 धावा वसूल केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले.

यापूर्वी दोन वेळा कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात 28 धावा निघाल्या आहेत पण त्या दोन्ही वेळा लारा व बेलीसारख्या कसलेल्य फलंदाजांनी पीटरसन व अँडरसनसारख्या गोलंदाजांचीच धुलाई केली होती. यावेळी मात्र फलंदाजीसाठी प्रसिध्द नसलेल्या केशव महाराजने हा पराक्रम केला आहे.,

या मनोरंजक षटकाच्या पहिल्या पाच चेंडूवर महाराजने सुरुवातीला लागोपाठ तीन चौकार व दोन षटकार लगावल्यानंतर शेवटच्या चेंडूवर बाईजच्या अवांतर चार धावा मिळाल्या.

याप्रकारे या षटकात 28 धावा निघाल्या असल्या तरी केशव महाराजच्या नावावर 24 धावा लागल्या मात्र कसोटी सामन्यात एकाच षटकात 28 धावा एकट्याने करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा व ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज बेली यांच्या नावावर आहे.

जो रुटने नव्या चेंडूसह राऊंड दी विकेट गोलंदाजी केलेल्या या षटकात
पहिला चेंडू- फुल टॉस आणि चेंडू मिडविकेटला- चौकार
दुसरा चेंडू- लेग साईडला असलेला चेंडू बाटीच्या मधली आणि खालची कड घेऊन बटलरच्या शेजारुन सीमापार- चौकार
तिसरा चेंडू- लेग स्टम्पच्या बाहेर पडलेला चेंडू लेग गलीच्या बाजूने बाहेर- चौकार

रुटची गोलंदाजी आता ओव्हर दी विकेट

चौथा चेंडू- ऑफसेटम्पच्या बाहेरचा चेंडू मिडविकेटला भिरकावला. षटकार!
पाचवा चेंडू- पुन्हा षटकार! ऑफ स्टम्पबाहेरचा चेंडू पुन्हा मिडविकेट सीमापार
सहावा चेंडू- 99 किलोमीटरच्या गतीने पडलेला चेंडू कुणालाच पकडता आला नाही आणि चार बाईज.एकाच षटकात 28 धावा!

कसोटी सामन्यात एकाच षटकात 28 धावा
1) ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) वि. रॉबीन पीटरसन (दक्षिण आफ्रिका), जोहान्सबर्ग 2003
2) जॉर्ज बेली (ऑस्ट्रेलिया) वि. जेम्स अँडरसन (इंग्लंड), पर्थ 2013
3) केशव महाराज (द. आफ्रिका 24 धावा + चार बाईज) वि. जो रुट (इंग्लंड), पोर्ट एलिझाबेथ, 2020