महापुराचे राजकारण

badgeकोल्हापूर, सांगलीमध्ये आलेल्या महापुराचे राजकारण करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांना फटकारले आहे. हे आवश्यक होते; पण तोपर्यंत खूप राजकारण झाले आहे. ज्या पद्धतीने उत्साही मंत्री गिरीश महाजन यांचा सेल्फी व्हिडीओ वाजवण्यात आला. त्यावरून विरोधकांना ह्या महापुराचे फक्त राजकारणच करायचे आहे हे उघड झाले.
तंत्रज्ञानाच्या जमान्यात हल्ली कुणीही कुणाचाही कसाही व्हिडीओ अगदी घरबसल्या बनवू शकतो याची कल्पना असताना विरोधक आणि चॅनेलवाल्यांनी कुठलीही शहानिशा न करता महाजनांना ठोकले. ते पाहता पश्चिम महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागा जिंकण्यासाठी युतीच्या नेत्यांना
जास्तीची मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्ही लिहून ठेवा. दोन महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सांगली, कोल्हापूरचा महापूर हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवला जाईल. पूरस्थिती पाहता निवडणूक पुढे ढकला,
अशी मागणी करून राज ठाकरे यांनी फटाके सुरूही केले आहेत.

ही बातमी पण वाचा : स्थितीवाद काँग्रेसच्या मूळावर

महापुराचे स्वरूप प्रलयंकारी होते. आज सहाव्या दिवशी पुराचे पाणी थोडे ओसरू लागले आहे; पण समस्या आणि वेदना कायम आहेत. त्या आणखी बरेच दिवस चिघळत राहतील. पूर केवळ शहरात नव्हता तर खेडोपाडी होता. चहूकडे पाणीच पाणी असताना तिथपर्यंत पोचणे दिव्यच होते. सरकारी यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. पुरात हजारो लोक अडकले आहेत याचा अंदाज साऱ्या यंत्रणेला आलाच नाही. जिल्हाधिकारी, तहसीलदार काय काम करतात हा प्रश्नच आहे. १० दिवसांपूर्वी महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकली, आता दोन जिल्हे अडकले. किती लोक अडकले याचा अंदाज घेऊन सरकारने तशी मदत तातडीने सैन्याची मागवली असती तर आज दिसतो तो लोकांचा आक्रोश कमी असता. २९ लोक मेले आहेत. जे वाचले त्यांचे प्रचंड हाल आहेत. हजारो लोकांसाठी प्रशासन तातडीने शंभरही बोटींची व्यवस्था करू शकत नसेल मग आपत्ती नियोजन कसले? लष्कर, नौदल चार दिवसांपूर्वी उतरले असते तर अधिकाऱ्यांचे नियोजन लक्षात आले असते.

विरोधकांनी ह्या पुराकडे पाहताना बघ्याची भूमिका घेतली. विरोधकांना जमेल तशी लोकांना हिंमत देता आली असती. शरद पवार आपत्ती व्यवस्थापनात मास्टर आहेत. मराठवाड्यातला किल्लारीच्या भूकंपात त्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची आजही तारीफ होते; पण पवारांनीही पुराच्या पाण्यात उतरण्याचा त्रास घेतला नाही. त्यांच्या राष्ट्रवादीचे नेते मंत्र्यांना झोडपण्यात आसुरी आनंद घेत राहिले. संकटे येतील आणि जातील. पण संकटात महाराष्ट्र एकसंघ होऊन लढतो आणि इथले नेते राजकारण विसरून संकटात सापडलेल्यांच्या मदतीला जमेल त्या पद्धतीने धावतात हे देशाला दाखवून देण्याची संधी आपण गमावली.