महाजनांच्या बालेकिल्ल्यात खडसेंकडून सुरुंग; भाजपचे २०० कार्यकर्ते राष्ट्रवादीत

Eknath Khadse-Girish Mahajan

जळगाव :- ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपला आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ नेते म्हणून ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या बालेकिल्ल्यात खडसेंनी सुरुंग लावला आहे. जामनेरमधील ‘दोन बस’ भरून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपमधून राष्ट्रवादीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं आऊटगोइंग सुरू  झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाजपचे २०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला राम राम ठोकला. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला.

दोन लक्झरी बसेस भरून भाजप कार्यकर्ते पक्षप्रवेशाच्या सोहळ्यासाठी दाखल झाले होते. खडसेंच्या मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसवर गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील भाजपच्या २०० कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भय्या पाटील, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यावेळी उपस्थित होत्या.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात आता राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास सुरुवातदेखील झाली आहे. सोमवारी जळगावात भाजपच्या ६० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रावेर तालुक्यातील ६० भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू झाले आहे.

ही बातमी पण वाचा : दिवाळीनंतर खानदेशात मोठा राजकीय भूकंप? खडसेंची मोठी घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER