महाजन म्हणाले, खडसे गेल्याने फरक पडणार नाही; मात्र आजच्या पक्षबांधणी बैठकीला कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

Girish Mahajan-Eknath Khadse

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अखेर भाजपला (BJP) मोठा हादरा दिला. गेल्या ४० वर्षांची भाजपची साथ खडसेंनी सोडली आणि भाजपला मोठे भगदाड पाडण्याची सुरुवात खडसेंनी केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

त्यातच खडसे गेल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही. जळगावात आमच्याकडे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची उणीव भरून काढणारे नेते आहेत, ही भाजप नेत्यांची वक्तव्ये आता वक्तव्येच ठरत आहेत;

कारण, एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये पक्षबांधणीसाठी आयोजित केलेल्या बैठकीकडे नेते आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर या ठिकाणी भाजपकडून बैठका घेण्यात आल्या. गुरुवारी मुक्ताईनगरमध्ये प्रथमच भाजपकडून पक्षबांधणीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला तुरळक स्थानिक कार्यकर्त्यांनीच हजेरी लावली. माजी मंत्री आणि एकनाथ खडसे यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. मुक्ताईनगर बैठकीत प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार रक्षा खडसे ,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे , अशोक कांडेलकर, डॉक्टर राजेंद्र फडके एवढेच लोक या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, एकनाथ खडसे गेल्याने भाजपला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचा दावा भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केला होता. भाजप हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो, असे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटले होते.

ही बातमी पण वाचा : पवार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत, खडसे पिता-पुत्रीला विधानपरिषदेत पाठवणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER