मुस्लिम शेतकऱ्याने स्वखर्चातून उभारले महादेवाचे मंदिर ; निवडणुकीतही सामाजिक एकोपा

धुळे :  आतापर्यंत अनेकदा आपण ऐकले आहे की, मुस्लिम लोकांचीही हिंदु देवदेवतांवर श्रद्धा आहे. त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. एका मुस्लिम शेतक-याने स्वखर्चातून शेतात महादेवाचे मंदिर बांधले आहे. धुळे तालुक्यातील बिलाडी येथे मुस्लिम समाजातील शेतकरी ( Muslim farmer) सांडू सुमन पिंजारी यांची भगवान महादेवावर प्रचंड श्रद्घा आहे. या श्रद्धेतून त्यांनी गावात सर्वात मोठे महादेवाचे मंदिर (Mahadev’s temple) उभारले आहे. तेदेखील कुणाकडूनही एक रुपयाही न घेता त्यांनी हे मंदिर बांधले आहे. या मंदिरात दोन दिवसांपूर्वी त्यांनी महादेवाची पिंड, नंदी आणि पार्वतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.

गेल्या पाच वर्षांत शेतातून मिळालेले उत्पन्न, मुलांनी केलेल्या आर्थिक मदतीतून त्यांनी या मंदिराचे बांधकाम केले. या मंदिराचे काम नुकतेच पूर्ण झाले. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच या मंदिरात भगवान महादेवाची पिंड, पार्वती आणि नंदी अशा तीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापूर्वी गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील नागरिकही सहभागी झाले. तसेच रविवारी भंडारा वाटप करण्यात आला. दरम्यान, संपूर्ण पिंजारी कुटुंबाने मंदिरात पूजाविधीही केला.

सांडू पिंजारी यांची भगवान महादेवावर नितांत श्रद्धा आहे. या श्रद्धेतून त्यांनी स्वत:च्या शेतात महादेवाचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला. हा संकल्प तडीस नेण्यासाठी त्यांनी पाच वर्षांपूर्वी शेतात मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. गावातील मुस्लिम व्यक्ती मंदिर उभारत असल्यामुळे अनेकांनी त्यांना मदत करण्यासाठी हात पुढे केले. मात्र, सांडू पिंजारी यांनी कुणाकडूनही मदत न घेता मंदिर उभारले.

निवडणुकीतही सामाजिक एकोपा

विशेष बाब म्हणजे बिलाडी गावात ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी सांडू पिंजारी यांच्या महादेव मंदिराच्या संकल्पपूर्ती कार्यक्रमात एक सहभाग नोंदवला. मूर्तीची मिरवणूक, प्राणप्रतिष्ठा आणि महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमातून सामाजिक आणि धार्मिक एकोपा निर्माण होण्यास मदत झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER