महाभारत कालचे-आजचे आणि चक्रव्यूह

Mahabharat

Shailendra Paranjapeमहाभारतामधे अभिमन्यू चक्रव्यूहात सापडला होता. त्याला कोरवसेनेनं घेरलं होतं आणि चक्रव्यूह भेदण्याची कला त्यानं जन्माला येण्यापूर्वीच आत्मसात केली होती पण चक्रव्यूहातून बाहेर पडण्यांच न शिकल्यानं ते कसब त्याच्यकडे नव्हतं. परिणामी, कृष्णासमक्ष अर्जुनपुत्र अभिमन्यू समरांगणात मारला गेला. हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे महाभारत (Mahabharat), रामायण (Ramayan) हे अखिल भारतवर्षाला परिचित असे ग्रंथ. रामायण महाभारत घडले की नाही, त्या कविकल्पना आहेत का, हे वाद उकरण्याची आमची इच्छा नाही पण या दोन ग्रंथांमधूनच जीवनाच्या सर्व रंगांचे, रसांचे, विविध कथानकांचे बीज सापडू शकते. म्हणून महाभारतातल्या अर्जुन, कृष्ण आणि भिमन्यूची आठवण झाली, इतकंच.

हा ही आठवण का झाली, हा प्रश्न पडू शकतो. कोणत्याही प्रकारची धार्मिक, पौराणिक चर्चा न करता याकडे बघावं अशी विनंती करतो आणि मनात आलेला प्रश्न मांडतो. मुळात मुलांची नावं ठेवताना काय विचार केला जातो…मुळात विचार केला जातो का…विचारपूर्वक किंवा अविचारानं ठेवलेल्या किंवा विचार न करता ठेवलेल्या नावाला जागण्याचं काम मुलं करतात का…की नावं विसंगत आहेत, असं सिद्ध करतात. यापैकी काहीही घडू शकतं कारण जन्मापेक्षा कर्मावर धारित फलप्राप्ती मनुष्यप्राण्याला इहलोकात होत असते, असं शहाणेसुरते सांगतात.

हे सारं आठवण्याचं कारण एका आजोबांनी आपला एक नातू अपरिपक्व असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. आता नातवानं नेमका कोणता परिपक्वपणा केला होता, हेही सांगणं आलं. हे कुणी जनरल सर्वसामान्य आजोबा किंवा सामान्य नातू नव्हेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस नावाच्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष शरद पवारसाहेब (Sharad Pawar) यांनी आपल्या पार्थ नावाच्या नातवाविषयी हे उद्गार काढले आहेत. नातवानं प्रमादच तसा केला होता. हा पर्थ म्हणजे पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचा मुलगा. होय, तोच पार्थ ज्यानं मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची २०१९ची निवडणूक लढवली होती. या पार्थाला श्रीरंग बारणे यांनी पुन्हा निवडून येत पराभूत केलं. पार्थ पवार यांनी आधी चित्रपट अभिनेते सुशांतसिंह रजपूत यांच्या मृत्यूबद्दल सीबीआय चौकशीची मागणी केली होती आणि चक्क जय क्षीराम हा भाजपा समर्थकांना शोभेल, मोदी भक्तांना आवडेल, असा नारा दिला होता. अर्थात, हे सारे सेलेब्रिटी, मोठे लोक, नेते नारे देतात ते हल्ली तरी ट्विटरवरून किंवा फेसबुकवरून किंवा वाहिन्यांना दिलेल्या बाईटामधून. पार्थ यांनी जय श्रीराम म्हटले ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे आणि सुशांतसिंह रजपूत मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी हेही त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ती पक्षाची भूमिका नाही, असं स्पष्ट करण्यात आलं.

स्वतः शरद पवारसाहेबांनी आता पार्थ अपरिपक्व आहे आणि त्याच्या मताला मी कवडीची किंमत देत नाही, असं सांगितलंय. मात्र, पवारसाहेबांचं विधान बुधवारी दुपारी वाहिन्यांवरून प्रसारित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन मंत्रिमंडळ बैठक संपण्यापूर्वीच पवारसेहांच्या घराकडे रवाना झाले. पवारसाहेबांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती आणि काय चर्चा झाली, ती संपूर्णपणे तथाकथित जवळच्या पत्रकारांनाही समजणं अशक्य आहे. मात्र, जी काही चर्चा झाली असणार ती परिपक्वपणेच झाली असणार कारण पार्थ पवार या चर्चेत नव्हते.

विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी हा सगळा पवार कुटुंबियांचा विषय आहे, असं मत व्यक्त केलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतणे हा संघर्ष गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे रूपानं पाहिलाय. अजित पवार यांनीही अचानक फडणवीस यांच्याबरोबर जाऊन शपथग्रहण केलं होतं, त्याला वर्षही झालेले नाही. ठाकरे बंधूंचे फटकारेही महाराष्ट्रानं पाहिले आहेत. त्यामुळं तर महाभारताची आठवण झालीय.

अर्थात, या महाभारतात अजितदादांचा अभिमन्यू त्यांच्याच पार्थामुळं झालाय का… पवारसाहेब म्हणतात एक आणि करतात वेगळेच, या अनुभवानंतर पार्थला अपरिपक्व असं जाहीर करून त्यांना काही वेगळंच साधायचं नाही ना…पेल्यातली वादळं पेल्यातच संपतात किंवा ….हेही महाराष्ट्रानं पाहिलं आहे. तेव्हा ही अपरिपक्वता उद्या कोणापुढं कशाचं ताट वाढून ठेवते, ते आजच्या महाभारतात तरी सांगणं अवघडच आहे. कारण त्या महाभारतात सूर्यास्ताला युद्धविराम होत असे पण आजच्या महाभारतात सूर्यास्तानंतरच युद्ध सुरू होते.

त्यामुळंच आता चक्रव्यूह भेदून अभिमन्यू बाहेर येतो का आणि महाभारत नव्यानं लिहिलं जातं का…की चक्रव्यूहच बलशाली ठरतो, हे येणारा काळच ठरवेल…. आणि हे आजच्या महाभारतातले कृष्णही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER