महाबली हनुमानाची गाथा ‘द लीजंड ऑफ हनुमान’ 29 जानेवारीपासून

The Legend Of Hanuman

छोट्या पडद्यावर पौराणिक चरित्रांवर आधारित मालिका आबालवृद्धांना प्रचंड आवडतात. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण, महाबली हनुमान, गणपती अशा देवांच्या कथा छोट्या पडद्यावर मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. आणि यापुढेही येत राहाणार आहेत. केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही पौराणिक कथा मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात आलेल्या आहेत. आता ओटीटी प्लॅटफॉर्मची (OTT Platform) दुनिया सुरु झाली असून यावरही पौराणिक वेब सीरीजना सुरुवात केली जाणार आहे. यातील पहिली वेबसीरीज आहे महाबली हनुमानाच्या (Lord Hanuman) जीवनावरील ‘द लीजंड ऑफ हनुमान’ (The Legend of Hanuman).

हनुमानाची १०८ नावे, पण एकच भावना- महाबली हनुमान. सीतमाईंसाठी रावणाच्या लंकेला जाळण्‍यापासून राक्षसांना ठार करणारा हनुमान, श्रीरामाप्रती निस्‍सीम भक्‍तीसाठी हनुमान ओळखले जातात. हृदयात फक्त रामाला जागा देणाऱ्या हनुमानाची जगभरातील लाखो भक्‍त पूजा-आराधना करतात. पण हनुमानाने स्‍वत:मधील क्षमतांचा शोध कसा घेतला याबाबत भक्तांना फार ठाऊक नाी. स्‍वत:ची दैवी शक्‍ती विसरलेला आणि इतर सहका-यांनी त्‍याला त्‍याच्‍यामधील देवत्वाचा शोध घेण्‍यामध्‍ये कशी मदत केली त्याची कथा आता अॅनिमेटेड वेबसीरीजमधून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. शरद केळकर यांचे कथाकथन असलेली ही वेबसीरीज हॉटस्‍टार स्‍पेशल्‍स अंतर्गत तयार करण्यात आली आहे.

ग्राफिक इंडियाची निर्मिती आणि शरद देवराजन, जीवन जे. कांग व चारूवी पी. सिंघल यांनी ही अॅनिमेशन वेबसिरीज तयार केली असून यात जागतिक दर्जाच्या व्हिज्‍युअल्‍सचा वापर करण्यात आलेला आहे. या वेबसीरीजचे दिग्‍दर्शन जीवन जे. कांग व नवीन जॉन यांनी केले असून शरद देवराजन, सरवत चड्ढा, अश्विन पांडे व अर्शद सय्यद यांनी लेखन केले आहे. ‘दि लीजंड ऑफ हनुमान’ वेबसीरीज १३ एपिसोड्समध्ये दाखवली जाणार असून ती हिंदीसह, तामिळ, तेलुगु, मराठी, बंगाली, मल्‍याळम व कन्‍नड अशा ७ भाषांमध्‍ये रिलीज केली जाणार आहे. २९ जानेवारी २०२१ रोजी डिस्ने+ हॉटस्‍टार व्‍हीआयपीवर ही वेबसीरीज सुरू होणार आहे.

सूत्रधाराची भूमिका साकारणाऱ्या शरद केळकर यांनी सांगितले, ‘आपल्‍यापैकी बहुतेक जण हनुमान देवाच्‍या कथा ऐकत किंवा टीव्हीवर पाहत मोठे झालो आहोत. आपल्‍याला त्‍यांच्‍या सुरूवातीच्‍या काळाबाबत थोडीच माहिती आहे. नंतरच्या त्यांच्या जीवनाबाबतची माहिती फार कमी लोकांना ठाऊक आहे. आम्ही या वेबसीरीजमध्ये त्यांचे संपूर्ण जीवन प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत. एक सूत्रधार म्‍हणून या वेबसीरीजला माझा आवाज देण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्‍य आहे असेही शरद केळकरने सांगितले.

ग्राफिक इंडियाचे सह-संस्‍थापक शरद देवराजन यांनी वेबसीरीजबाबत बोलताना सांगितले, ‘छोट्या पडद्यावर प्रथमच महाबली हनुमानाचे भव्‍य विश्‍व आणि देव बनण्‍यामागील पौराणिक कथा, राक्षस, वन्य प्राणी, मानववंशिक कुळ इत्यादी गोष्टी उच्‍च दर्जाच्‍या अॅनिमेशनच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना पाहण्‍यास मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER