राज्यातील महाआघाडीचे सरकार आपोआपच पडेल : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

पुणे : राज्यातील महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप कोणतेही प्रयत्न करणार नसून ते आपोआपच पडेल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले आहे. राज्यात भीषण परिस्थिती असून कोण काय बोलते ते कळतच नसल्याचे ते म्हणाले.

भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांशी केलेली तुलना, इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात सध्या तापले आहे. गोयल यांच्या पुस्तकावरून शिवसेनेने भाजपला घेरले होते. मात्र या प्रकरणात बॅकफूटवर गेलेल्या भाजपला संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आयतीच संधी चालून आली आहे. पाटील यांनी ही संधी साधत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

संजय राऊत यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबद्दलचे वक्तव्य अशोभनीय व निंदनीय असून त्यात तथ्य असल्यास चौकशी व्हायला हवी अशी मागणी करत ते म्हणाले, तसे नसल्यास काँग्रेसने गांभीर्याने विचार करावा. मोदी व शिवाजी महाराज यांच्या तुलनेच्या वादावरून निशाणा साधत पाटील म्हणाले, २०१२ मध्ये संजय राऊत यांनी स्वत: बा‍ळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली होती. कोणत्याही पक्षाने महापुरुष आणि राजकीय व्यक्तींची तुलना करूच नये, असे ते म्हणाले.

मनसेसोबत युती? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले…