आमच्याकडे 171 आमदार, सरकार पडणार नाही; शिवसेनेच्या नेत्याने राणेंचा दावा फेटाळला

Eknath Shinde - Narayan Rane

मुंबई : भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याचा दावा केला आहे . मात्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. आमच्याकडे 171 आमदार असून आमचे सरकार दमदारपणे काम करत आहे. मागेही मार्चमध्ये सरकार पडणार असल्याचं भविष्य वर्तवण्यात आलं होतं. पण या सरकारने वर्षपूर्ती पूर्ण केली असून सरकारला कोणताही धोका नाही, असे एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी स्पष्ट केले आहे.

सरकार पडेल म्हणून काही लोक पहिल्या दिवसापासून पाण्यात देव बुडवून बसले आहेत. पण आमच्याकडे 171 आमदार आहेत. सरकारला काहीही धोका नाही. गेल्यावर्षी मार्चमध्येही सरकार पडण्याचं भविष्य वर्तवण्यात आले होते . त्यानंतरही आम्ही दमदारपणे काम करत असून हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान एकीकडे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शिवसेनेच्या नेत्यांना नोटीस बजावल्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार पाडण्याचा मुहूर्त शोधून काढला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस हे सरकार दिसणार नाही, असा दावाच राणेंनी केला आहे.

सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत असताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार कोसण्याबद्दल भाकीत वर्तवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER