मध्यप्रदेशातील काँग्रेसचा ‘तो’ मुख्यमंत्री ज्याच्या नावाच्या भीतीमुळे भाजपाला आजही मिळतेय जनसमर्थन !

Digvijay Singh

दिनांक १२ जानेवारी १९९८ रोजी मध्यप्रदेशच्या एका तहसीलदार कार्यालयासमोर हजारो शेतकरी जमले होते. शेतकऱ्यांत तीव्र असंतोष होता. पिकाला आलेल्या रोगामुळे त्यांनी सर्वस्व गमावलं होतं. हरण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नव्हतं. तेवढ्यात आराडाओरडा सुरू होते. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी जमलेल्या पोलीस प्रशासनाला गर्दी वेढा घालते. पोलीस हवेत गोळाबार करायला सुरुवात करतात. जसजशा गोळ्या हवेत उडवल्या जातात तसा जमाव पोलिसांच्या दिशने सरकतो. शेवटी बंदुकीच्या नळीचा रोख शेतकऱ्यांच्या जमावाच्या दिशेने होतो.

एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्या जातात. त्या दिवशी १९ जणांचा जीव गेला. १८ शेतकऱ्यांचा आणि एका फायर ब्रिगेड ड्रायव्हरचा, जो जमावाच्या हाती लागला होता. ही घटना बैतूल गोळीबार कांड म्हणून इतिहासात नोंदवली गेली. हे होऊनसुद्धा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री निवडणूक जिंकले, सलग दुसऱ्यांदा… पण नंतर त्यांचा असा पराभव झाला की, त्यांची पार्टी १५ वर्षे वनवास भोगत होती. ही गोष्ट मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्याची दिग्विजय सिंहांची. मध्यप्रदेश कधी काळी काँग्रेसचा गड होता. या गडाला भाजपचा भगवा रंग चढेपर्यंत काँग्रेसचे दिग्विजयसिंह मुख्यमंत्री होते. ते मध्यप्रदेशच्या राघवगड राज परिवारातले. २८ फेब्रुवारी १९४७ चा जन्म. लहानपणापासून हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये त्यांना रस होता.

दिग्विजयसिंहांचे वडील सक्रिय राजकारणात होते. २२ व्या वर्षी त्यांनी नगरपालिका निवडणूक जिंकली. विजय निश्चित होता. त्यांच्या विजयामुळं कोणालाच आश्चर्याचा धक्का बसला नाही. मध्यप्रदेशच्या राजगढ- ब्यावरा पट्ट्यात आजही त्यांना ‘राजासाहब’ या नावानं हाक दिली जाते. दिग्विजयसिंह काँग्रेसमध्ये गेल्यावर मात्र सर्वांना धक्का बसला. काँग्रेसच्या खासदार राहिलेल्या विजयाराजे शिंदे यांना दिग्विजयसिंह आपल्या गटात असावेत अशी इच्छा होती. ज्यांच्या पतीला दिग्विजयसिंहांचे वडील अन्नदाता म्हणायचे; कारण राघवगड संस्थान ग्वाल्हेरच्या अधीन होतं. १९७७ ला दिग्विजयसिंहांनी भोपाळ विजयाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. राघवगडमधून ते आमदार झाले. १९८० ला फेरनिवडणुका झाल्या अर्जुनसिंह सरकारमध्ये ते मंत्री झाले. राजघराण्यातला क्षत्रिय बाणा गट बांधण्यात त्यांना इथं कामी आला.

१९८४ला त्यांनी दिल्ली जवळ केली. ते खासदार झाले. पक्षात ज्या युवकांना राजीव गांधी पुढं आणत होते, त्या यादीत दिग्विजयसिंहांचंदेखील नाव होतं. पुढच्या विधानसभेत अर्जुनसिंहांनी विधानसभा जिंकली; पण त्यांना चंदीगडच्या राज्यपालपदी पाठवण्यात आलं. मुख्यमंत्रिपदाची रस्सीखेच होती…. मोतीलाल वोहरा आणि दिग्विजयसिंह यांच्यात. दिग्विजय दिल्लीहून परतले अर्जुनसिंह आणि राजीव गांधींचा विश्वास आणि एक नवं नाव घेऊन ‘दिग्गीराजा’. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी ते विराजमान झाले वयाच्या ४६ व्या वर्षी.

बाबरी प्रकरण

कॅलेंडरनुसार विधानसभा निवडणूक अजून अडीच वर्ष लांब होती. पण ते वर्ष कॅलेंडरच नाही बाबरी विध्वंसाचं होतं. आणि सरकार १९९२च्या डिसेंबरला बरखास्त झालं. आता कारभार राजभवनावरून चालत होता. नोव्हेंबर १९९३ ला विधनासभा निवडणूक घोषित झाली. तिकीट वाटपावरून काँग्रेसच्या अंतर्गत श्यामचरण शुक्ल, माधवराव शिंदे , अर्जुनसिंह यांच्या सहमतीचा मोठा भाग होता. काँग्रेसनं ३२० पैकी १७४ जागा जिंकल्या. गटातटाच्या राजकारणात दिग्विजयसिंहांनी बाजी मारली. त्यांच्या राजकीय गुरूच्या विरोधात जाऊन. अर्जुनसिंह ज्यांच्यामुळे दिग्विजय पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते.

आता त्यांच्याविरोधात जाऊन दिग्गीराजाने भोपाळचं तख्त काबीज केलं. दिग्विजयसिंह राजकीय सामंजस्यामुळं जितके प्रसिद्ध होते तितकेच कुप्रसिद्ध होते. एकदा भरसभेत म्हणाले होते, “निवडणुका रस्ते बांधून नाही सत्ताडाव खेळून जिंकल्या जातात.” यानंतर मुख्यमंत्रिपद ताब्यात असल्यापासून त्यांनी चुकांवर चुका केल्या. सरकार चालवण्यासाठी कॉन्ट्रक्ट कल्चर घेऊन आले. यामुळं कर्मचाऱ्यांची नाराजी त्यांना ओढवून घ्यावी लागली. मध्यप्रदेशचे रस्ते दुर्लक्षित राहिले. वीज वितरणाचा तर पत्ताच नव्हता. मध्यप्रदेशची फाळणी होऊन छत्तीसगड जन्माला आलं.

दिग्विजय म्हणाले, सारी वीजनिर्मितीची यंत्रणा तर छत्तीसगड राज्याकडं गेली, सांगा वीज कुठून देऊ? जनतेनं याचंही उत्तर दिलं… उमा भारतींना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देऊन. दिग्गीराजा पराभूत तर झाले, पुढं माध्यमांशी बोलताना म्हणाले, “काँग्रेसचा पराभव होऊच शकत नाही. जर झालाच तर मी दहा वर्षे सत्तेतून दूर राहीन.” जनतेनं त्यांचे हे बोल खरे करून दाखवले. मागच्या विधानसभा निवडणुकीत कमलनाथांनी सत्ता मिळवली होती; पण ऑपरेशन लोटस करून पुन्हा भाजप सत्तेत आली. निवडणुका लोकसभेच्या असो की विधानसभेच्या दिग्विजयसिंहांचे गोळीबारीचे आदेश, खराब रस्ते, कधी नसणारी वीज त्यांच्या वाईट प्रशासनाचे दाखले देत भाजप आजही मध्यप्रदेशच्या जनतेला दिग्विजयसिंहांच्या नावाची सातत्याने आठवण करून देत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER