माधुरी पवार म्हणतेय…व्हय आम्ही येतोय

Tujhat Jiv Rangala

लवकरच ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप या चर्चेचा नूर एकदम असा काही पलटला की मालिका संपणार हे तर लांबच पण मालिकेतील वहिनीसाहेब तुरूंगातून सुटून थेट गायकवाडांच्या वाड्यात परतणार असल्याचे ट्वीस्ट आले. होय, तुझ्यात जीव रंगला या मालिकेत नंदिता वहिनीची एन्ट्री होणार आहे. आता जिने ही भूमिका लोकप्रिय केली ती धनश्री कांडगावकरकडे गुडन्यूज असल्यामुळे ती तर नंदिता म्हणून दिसणार नाही हे पक्के. मग नंदिताचा तो ठसका घेऊन कोण येणार याची उत्सुकता संपली आहे. अप्सरा आली या शोची विजेती माधुरी पवार ‘व्हय, आम्ही येतोय’ या खास नंदिताच्या स्टाइलमध्ये एन्ट्री घेणार आहे.

चार वर्षे आणि बाराशे एपिसोड असा लांबलचक प्रवास करत सुरू असलेली तुझ्यात जीव रंगला ही मालिका म्हणजे टीआरपीचा पाऊस. पैलवानगडी राणा आणि आदर्श शिक्षिका अंजली यांचे प्रेम, मग लग्न, त्यानंतर कधी लुटूपुटूचे तर कधी कडाक्याचे भांडण, कौटुंबिक वाद, गावातील चर्चा अशा अनेक अंगांनी फुललेली ही मालिका चांगलीच गाजतेय. चार वर्षात मालिका कधी रटाळ बनली तर कधी पुन्हा टर्न घेत टिकून राहिली. लॉकडाउनच्या आधी मालिकेत नवं नाट्य आलं होतं आणि कटकारस्थान उघड झाल्यामुळे राणाच्या वहिनीसाहेब म्हणजे नंदिता ही नवरा सूरजसह तुरूंगात गेल्याचं कथेत दाखवण्यात आलं. नंदिता या पात्राचा प्रवास थांबल्यामुळे धनश्रीही मालिकेत ऑफकॅमेरा गेली. खरंतर धनश्री या मालिकेतील खलनायिका, पण तिने अभिनयातून नंदिता ठसक्यात वठवली.

आता गेल्या काही दिवसांपासून अंजलीबाई वेश बदलून जिजाच्या रूपात आल्या आहेत. जिजाचा ट्रॅक सुरूवातीला रंजक वाटला असला तरी आता प्रेक्षकांना या मालिकेत तोचतोचपणा आल्याचे दिसत असल्याच्या प्रतिक्रिया चॅनेलकडे यायला सुरूवात झाली आहे. टीआरपी खाली जाणारा ट्रॅक आला की एकतर मालिकेतील कलाकार गायब केला जातो किंवा गायब असलेला कलाकार पुन्हा आणला जातो. ही मात्रा नेहमीच आपण मालिकांमध्ये पाहतो. त्यामुळे तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या लोकप्रियतेचे चक्र फिरवण्यासाठी नंदिताशिवाय पर्याय नाही.

नंदिता म्हणून धनश्रीच्या जागी माधुरी पवार दिसणार आहे. माधुरी खरंतर लावणी नृत्यांगना आहे. अप्सरा आली या शोमध्ये ती विनर झाली. साताऱ्याची ही पोरगी डान्समध्ये पारंगत आहे. पण यानिमित्ताने अभिनयाचा तालही सांभाळण्याची संधी तिला मिळाली आहे. माधुरीचे बरचसे लूक हे धनश्रीसारखे असल्यामुळे नंदिताच्या व्यक्तीरेखेसाठी घेण्यात आलेल्या स्क्रिनटेस्टमध्ये माधुरीने बाजी मारली.

माधुरी सांगते, मला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे. डान्स म्हटलं की त्यात अभिनयही असतो, पण मी पूर्णपणे अभिनय करेन असं मला वाटलं नव्हतं. नंदिता वहिनी ही भूमिका खूप लोकप्रिय होती. त्यांच्या चालण्याबोलण्यापर्यंतची प्रत्येक लकब धनश्रीताईने सेट केली आहे. मी साधारण धनश्रीताईसारखी दिसत असले तरी नंदिता म्हणून भूमिका निभावण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

माधुरी मुळची साताऱ्याची आहे. तिचे वडील गवंडीकाम करत असल्यामुळे जिथे बांधकाम असेल तिथे त्यांचे कुटुंब राहत होते. यामुळे माधुरी खूप गावांमध्ये राहिली आहे. याचा फायदा तिला असा झाला की अनेक लोकांच्या बोलण्याची पद्धत तिने निरीक्षण केली आहे. त्याचा उपयोग तिला डान्समधील किंवा अभिनयातील एक्स्प्रेशनमध्ये होतो.

नंदिताची एन्ट्री हा खूप चर्चेचा विषय बनला असल्याने माधुरीवरही दडपण आलं आहे. आजच्याच एपिसोडमध्ये नंदिताचे आगमन होणार आहे. मधल्याकाळात या मालिकेत पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आहे. राणा पोलिस बनला, त्यानंतर खोट्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यामुळे फरार झाला. निर्दोष असल्याचे सिद्ध केल्यानंतर पुन्हा त्याचे अंजलीशी वाजले. दरम्यान मामाची भाची माधुरी हिने कट रचल्याचे उघड झाले. तर सध्या अंजली जिजा बनून राणाचे मन जिंकण्यासाठी ठिय्या मारून बसली आहे. या सगळ्या नाटयमय घडामोडीत नंदिता वहिनीची एन्ट्री म्हणजे धमाका होणार आहे. मालिका निरोप घेणार असल्याच्या अफवांना फाटा देत नंदिताची एन्ट्री करत माधुरी पवार आता अभिनयातील अप्सरा कशी होते हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER