मधुराणी झाली भावूक

madhurani gokhale prabhulkar

कलाकारांची प्रसिद्धी, त्यांच्या भोवती असलेले वलय आपल्याला नेहमीच आकर्षित करत असतं. कलाकारांना त्यांच्या कुटुंबीयांपासून बरेच दिवस लांब राहावं लागतं. त्यातही जर दैनंदिन मालिकेत काम करणारे कलाकार असतील तर 18 ते 20 तास सेटवर असतात. कधीकधी शूटिंगच्या शेड्युलप्रमाणे त्यांना सेटवर रहावे लागतं आणि मग जेव्हा अचानक सेटवर कुटुंबातील कोणीही सदस्य भेट देतो तेव्हा या कलाकारांचा आनंद गगनात मावत नसतो. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले (Madhurani Prabhulkar Gokhale) हिने नुकताच हा अनुभव घेतला. आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर तिला न सांगता तिची लाडकी लेक स्वराली आणि नवरा प्रमोद यांनी भेट दिली. स्वरालीला घट्ट मिठी मारत पडद्यावरच्या आईपेक्षा पडद्याबाहेरची आई जास्त भावूक झाली.

मधुराणी प्रभुलकर ही सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती देशमुख ही भूमिका साकारत आहे. या मालिकेचं शूटिंग ठाण्यात सुरू असून सध्या ही मालिका रंजक वळणावर आली आहे. त्यामुळे मालिकेचे जास्तीत जास्त एपिसोड शूट केले जात आहेत. त्यातही कोरोना लॉकडाऊन मुळे मालिकेच्या शूटिंगमध्ये खंड पडला होता. अनलॉक झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या दमाने या मालिकेची टीम कामाला लागली आहे. पडद्यावर मधुराणी जी भूमिका साकारत आहे ती अशाच आईची आहे जिने आपले सगळे आयुष्य आपल्या कुटुंबासाठी व्यतीत केले आहे. तिला तिचं घर, तिचं कुटुंब, मुलं यापेक्षा दुसरं काहीच सुचत नाही. अशी ही व्यक्तीरेखा आहे. सहाजिकच पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातदेखील मधुराणी गोखले ही तिची मुलगी स्वरालीसाठी खूप काही करत असते. लाकडाउनमध्ये मधुराणी घरी होती तेव्हा तिने आपला जास्तीत जास्त वेळ मुलगी स्वरालीसोबतच घालवला. त्यामुळे आई जास्तीत जास्त वेळ आपल्या सहवासात आहे याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पण अनलॉक झाले आणि पुन्हा एकदा शूटिंगला जाण्याची वेळ झाली तेव्हा मधुराणी आणि स्वराली यांचा सहवास साहजिकच कमी झाला. अर्थातच स्वरालीला हे माहित आहे तिचा तिची आई कुठल्या पद्धतीचे काम करते. आणि त्यामुळे आपल्या आईला आपल्याला जास्त वेळ देता येणार नाही पण जेव्हा जेव्हा दोघींना वेळ मिळतो तेव्हा धमाल-मस्ती या दोघींची सुरू असते.

मधुराणी सांगते, गेल्या काही दिवसांपासून आमचं फोनवर बोलणं सुरू होतं. पण अचानक तिने बाबांसोबत माझ्या सेटवर येत मला आश्चर्याचा धक्का दिला. स्वरालीला जेव्हा समोर पाहिलं तेव्हा आधी आम्ही कडकडून मिठी मारली. स्वराली मला येऊन अशी काही बिलगली की क्षणभर हे विसरूनच गेले की मी सेटवर आहे. मला असं वाटलं की आम्ही दोघी घरी आहोत. स्वराली सेटवर आली तेव्हा काहीही न बोलता ती माझ्या कडेवर बसली. पुढची पाच ते दहा मिनिट तिने माझी मिठी सोडली नव्हती. खरे तर, आई कुठे काय करते या मालिकेत मी आईची भूमिका करत आहे. आणि आई काय असते ,आई झाल्यानंतर अशा कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या आपल्याला पेलाव्या लागतात या सगळ्याचा अनुभव मला स्वरालीच्या जन्मानंतर आला. ही भूमिका खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी मला स्वरालीमुळे झालेल्या आईपणाची खूप मदत झाली. जेव्हा स्वराली अचानक सेटवर आली आणि मला भेटली तेव्हा खरच माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला स्वरालीची खूप साथ मिळत असते. माझं शूटिंग शेड्युल असेल किंवा अनेकदा तिच्या छोट्या छोट्या गोष्टी पाहण्यासाठी मी तिथे नसते पण ती मला खूप छान पद्धतीने समजून घेते.

मधुराणी गोखले ही जितकी अभिनेत्री म्हणून आता सध्या लोकप्रिय आहे तितकीच ती एक संवेदनशील कवयित्री देखील आहे. तिचे यूट्यूब चैनल असून या चॅनलच्या माध्यमातून तिने अनेक कलाकारांच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत. नवरा प्रमोद प्रभुलकर याच्यासोबत ती प्रशिक्षण संस्था चालवते. नवरा माझा नवसाचा या सिनेमात मधुराणीचा अभिनय सगळ्यांनाच आवडला होता. त्याशिवाय तिने अनेक सिनेमांमध्ये व मालिकांमध्येही काम केले आहे. सध्या आई कुठे काय करते या मालिकेतील ती साकारत असलेली अरुंधती देशमुख ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत ती उत्तम आई आहेच पण व्यक्तीगत जीवनातदेखील अतिशय चांगली आई बनण्याचा सतत प्रयत्न करत असते. स्वराली एक उत्तम माणूस झाली पाहिजे यासाठी मधुराणीचा नेहमी प्रयत्न असतो. सहा वर्षाच्या मुलीपासून 12 ते 18 तास लांब राहिल्यानंतर जेव्हा तीच आपल्याला भेटायला येते तेव्हा नेमका काय आनंद होतो हे या दोघी मायलेकींच्‍या भेटीनंतर दिसले. आई कुठे काय करते या मालिकेतील टीमने हा क्षण डोळ्यात साठवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER