मधु मंगेश कर्णिक यांना ‘जनस्थान पुरस्कार’ जाहीर

Madhu Mangesh Karnik

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आज नाशिक येथे पत्रपरिषदेत ही घोषणा केली.

मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या जीवनावर ठसा उमटविणाऱ्या साहित्यिकाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. एक लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याआधी डॉ. विजया राजाध्यक्ष, अरूण साधू, भालचंद्र नेमाडे, इंदिरा संत, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर अशा दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. १० मार्च रोजी नाशिक इये होणाऱ्या विशेष सोहळयात मधू मंगेश कर्णिक यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

मधु मंगेश कर्णिक हे रत्नागिरी येत्ये झालेल्या ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ग. दि. माडगुळकर प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार, दमाणी पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आदी मानसन्मान त्यांना लाभले आहेत. कर्णिक यांनी ‘करूळचा मुलगा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

कर्णिक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक आहेत. याशिवाय कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट या संस्थांचे संस्थापकही आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता. तसेच मालगुंड येतील कवी केशवसुत स्मारकाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER