
कलाकारांना भूमिकांच्या निमित्ताने वेगवेगळ्या व्यक्तिरेखांशी समरस व्हावे लागते त्याचप्रमाणे अनेकदा ती भूमिका एखाद्या शहराच्या भाषेशी जोडलेली असल्याने त्या-त्या शहराची भाषादेखील आत्मसात करावी लागत असते. मग प्रत्यक्ष मालिका किंवा सिनेमा पडद्यावर येण्यापूर्वी कलाकारांना भाषेसंदर्भात धडे गिरवावे लागतात. कलाकार जितके अभिनयाचे दडपण घेत नाहीत किंवा एखादी व्यक्तिरेखा साकारण्याचे जेवढे दडपण घेत नाहीत तेवढे अनेकदा त्यांना त्या त्या भूमिकेसंबंधित भाषा बोलण्याची भीती वाटत असते. असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar) हिच्या बाबतीत. ती सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये खलनायिका शालिनीची भूमिका करत आहे. या मालिकेमध्ये शिर्के पाटील हे कुटुंब कोल्हापूरचे असल्यामुळे संपूर्ण मालिकेमध्ये कोल्हापूरची भाषा बोलावी लागणार होती. याच गोष्टीचे माधवीला सुरुवातीला खूप दडपण आलं होतं. इतकंच नव्हे तर तिने भीतीदेखील घेतली होती. पण मालिका सुरू झाल्यानंतर मात्र माधवीने कोल्हापूरी भाषेचा सूर चांगलाच पकडला आहे.
लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे प्रोमो झळकले होते. या मालिकेचे शूटिंग कोरोना काळातील लॉकडाउनमुळे थांबलं होतं. दरम्यानच्या काळात पडद्यामागील गोष्टी सुरू होत्या त्यामध्ये माधवी शालीनीची भूमिका करणार हे ठरलं होतं. त्यानुसार तिला स्क्रिप्ट पाठवण्यात आले होते. खरेतर सुरुवातीला शालिनी हे पात्र कोल्हापुरी ग्रामीण भाषा बोलणार नाही असं ठरलं होतं. कारण या मालिकेत शालिनी शिकलेली आहे. तिला फॅशन सेन्स आहे. त्यामुळे या मालिकेतील इतर सर्व कलाकार कोल्हापुरी भाषा बोलतील पण शालिनी शुद्धभाषा बोलेल असा विषय होता.
माधवी सांगते, कोल्हापुरी भाषा ही जितकी गोड आहे तितकी ती बोलायला खूप अवघड आहे. कोल्हापूरचे काही विशिष्ट शब्द आहेत. ती भाषा बोलण्याची एक ढब आहेत. ती जमली पाहिजे. त्यामुळे मला ती जमेल की नाही असं मला वाटत होतं त्यामुळे मला या भूमिकेचे जेवढे टेन्शन आलं नव्हतं तेवढं भाषेचं आलं होतं. पण सेटवर तेजस नावाचा एक मुलगा आहे ज्याने आम्हाला कोल्हापुरी भाषा कशी बोलायची हे शिकवलं. प्रत्यक्ष या मालिकेचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी आम्ही कोल्हापुरी भाषेचादेखील अभ्यास केला आणि म्हणूनच सध्याची शालिनी कोल्हापुरी भाषा बोलताना दाखवली आहे त्याचं श्रेय कुठेतरी त्या सगळ्या वर्कशॉपला आहे. माधवी
निमकर म्हणजे सध्याची माधवी कुलकर्णी. ती खोपोलीची पण कामाच्या निमित्ताने आता ती मुंबईतच राहते. अभिनेत्री सोनाली खरे ही माधवीची चुलत बहीण. एकदा सोनालीसोबत माधवी ईटीव्ही च्या ऑफिस मध्ये गेली असताना त्याठिकाणी तिला बघून गाणे तुमचे-आमचे या शोचं निवेदन करणार का असं विचारण्यात आलं. माधवीनेही होकार दिला आणि माधवीची छोट्या पडद्यावर निवेदिका म्हणून एंट्री झाली. पुढे तिने मालिका सिनेमामध्ये काम करत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. स्वप्नांच्या पलीकडले, अवघाचि संसार या मालिकेतील माधवीच्या भूमिका गाजल्या होत्या. नवरा माझा भवरा, सगळं करून भागला देवपुजेला लागला या सिनेमातही माधवीने काम केले आहे. प्रत्यक्ष आयुष्यात माधवी फिटनेसप्रेमी असून कितीही व्यस्त दिनक्रम असला तरी योगा करण्याला ती कधीच सुट्टी देत नाही. लॉक डाउनमध्येही तिने केलेल्या योगाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला