माका – केसस्वास्थ्याकरीता उत्तम पर्याय !

भृंगराज

माकाचे पर्यायी नाव भृंगराज म्हणजेच ज्या वनस्पतीमुळे केस भोवऱ्याप्रमाणे काळे राहतात. नावातच गुण कथन केलेली ही वनस्पती म्हणजे माका. मार्कव ( केसांना काळे करणारा), केश्य, पितृप्रिय, केशरंजन अशी पर्यायी नावे आहेत माक्याची. परंतु या व्यतिरिक्त भृंगराज अनेक विविध रोगांवर उपयोगी ठरतो. आयुर्वेदात लेप तेल वटी यात माक्याचा वापर केला जातो. भृंगराजाचे ४-५ फूट झाड असते. औषधी प्रयोगार्थ माक्याचे पंचांग म्हणजेच मुळासकट सर्व भाग वापरण्यात येतात.

माक्याचे बीजसुद्धा उपयोगी आहे. माक्याचे औषधी म्हणून काय उपयोग आहेत ते बघूया –

माक्याचा रस शिरःशूलावर डोक्यावर चोळल्यास डोकेदुखी थांबते.

सूर्यावर्त नावाच्या व्याधीत सूर्याची उष्णता जशी वाढत जाते तसे डोक दुखणे डोके जड पडणे अशी लक्षणे वाढतात. सूर्य जसाजसा माथ्यावर येतो लक्षणे उग्र होतात व संध्याकाळ झाली की वेदना कमी होतात. या अवस्थेत माक्याचा रस शेळीच्या दूधात मिसळून नस्य करतात.

जखम किंवा फोड झाले असतील तर माक्याचा लेप लावतात. त्यामुळे व्रण जखम खूप लवकर भरून येतात शिवाय त्वचेचा वर्ण पुन्हा त्वचेच्या रंगाप्रमाणे होतो.

केसांच्या तक्रारींचे प्रमाण आजकाल वाढलेले आहेत. विविध शॅम्पू औषध पॅक आपल्याला दिसतात. परंतु केस वाढण्याकरीता शिवाय केसांचा रंग प्राकृत राहण्याकरीता माका उत्तम कार्य करतो. माका रस केसांना चोळल्यास केस छान वाढतात शिवाय पांढरे केस काळे होतात. केसांचा रंग चांगला होतो.

केशधावनाकरीता शॅम्पू ऐवजी माक्याचा शिकेकाई रिठासह वापर केल्यास केसांचे आरोग्य उत्तम राहते.

बऱ्याच जणांना भृंगराज तेल माका तेल माहिती असेलच. माक्याने सिद्ध तेलाचा प्रयोग केसांच्या तक्रारींवर प्रसिद्ध उपाय आहे.

भृंगराज अथवा माका यकृत प्लीहा रोगांवर उत्तम कार्य करतो. भृंगराजासवसारखी औषधे यकृताचे विकार दूर करून यकृताला बल देते.

आयुर्वेदात पाण्डु कामला कुष्ठ शितपित्त अशा अनेक विकारांमधे औषधीरुपात भृंगराज वनस्पतीचा वापर केला आहे. कृमी जंत झाले असतील तर भृंगराज (माका) रस एरंड तेलासह देतात. त्यामुळे मलाशयातून कृमीपतन होते.

अशा विविध स्वरूपात विविध औषधीकल्पात माक्याचा उपयोग होतो. भृंगराज तेल षडबिंदू तेल भृंगराजासव इ. अनेक कल्प भृंगराज वनस्पतीपासून बनवितात. केश्य केशराज केशरंजन भृंग अशी विशेष ओळख असलेली ही माका वनस्पती!

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER