एम. जे. अकबर बदनामी खटल्यात प्रिया रामाणी यांची निर्दोष सुटका

Priya Ramani - Mj Akbar
  • लैंगिक छळाचा आरोप न्यायालयाने ‘सत्य’मानला

नवी दिल्ली : ज्येष्ठ संपादक आणि माजी केंद्रीय मत्री एम. जे. अकबर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी खटल्यात येथील न्यायालयाने बुधवारी पत्रकार प्रिया रामाणी यांची निर्दोष मुक्तता केली. अकबर यांनी त्यांच्यासोबत काम करत असताना आपला लैंगिक छळ केला होता या रामाणी यांच्या आरोपात सकृद्दर्शनी सत्य दिसत असल्याने आणि रामाणी यांनी अकबर यांच्या या दुष्कृत्याची जाहीर वाच्यता सद्हेतून व व्यापक जनहितासाठी केलेली असल्याने ही गुन्हेगारी स्वरूपाची भदनामी ठरत नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.

दोन वर्षांपूर्वी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून केल्या गेलेल्या लैंगिक दुष्कृत्यांना पीडित स्त्रियांनी वाचा फोडण्याची समाजमाध्यमांतील एक Me-too चळवळ अमेरिकेत सुरु होऊन तिचे लोण भारतातही पोहोचले होते. पूर्वी रामाणी यांनी ‘दि व्होग’ या नियतकालिकात लिहिलेल्या एका लेखात पत्रकार म्हणून काम करत असताना एका संपादकाकडून आपला कसा लैंगिक छळ झाला होता, याबद्दल लिहिले होते. ’Me-too चळवळ सुरु झाल्यावर सन २०१८ मध्ये रामाणी यांनी आधीच्या आपल्या लेखात उल्लेख असलेले संपादक अकबर होते, असे ट्वीट केले. अशा प्रकारे त्या लैंगिक छळाच्या कथित घटनेनंतर कित्येक वर्षांनी रामाणी यांनी तो आपला लैंगिक छळ करणारे अकबर होते, असा आरोप केला. नंतर या चळवळीचा रेटा एवढा वाढला की, अकबर यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

पत्रकार आणि संपादक या नात्याने चार दशकांहून अधिकच्या आपल्या कारकिर्दीत आपल्या हाताखाली असंख्य महिला पत्रकारांनी काम केले. पणअसा घृणास्पद आरोप आपल्यावर कधी कोणी केला नाही. रामाणी यांनी Me-too ‘चळवळीच्या ओघात हात धुवून घेण्यासाठी आपल्यावर हा आरोप इतक्या वर्षांनी करून आपल्या निष्कलंक चारित्र्यावर शिंतोडे उडवून आपली बदनामी केली, असे म्हणत अकबर यांनी हा खटला दाखल कोल होता.

दंड विधानात बदनामीच्या गुन्ह्याला काही अपवाद दिलेले आहेत. आरोपीने केलेले फिर्यादीची अप्रतिष्ठा करणारे केलेले विधान सत्य असेल व ते सदहेतूने व व्यापक जनहितासाठी केलेले असेल तर ती बदनामी होत नाही, असा हा अपवाद आहे. रामाणी यांनी केलेले विधान या अपवादात बसणारे आहे, असा निष्कर्ष नोंदवून अतिरिक्त महानगर दंडाधिकारी रवींद्र कुमार पांडे यांनी हा निकाल दिला.

न्यायालयाने म्हटले की, समाजात प्रतिष्ठा असलेली व्यक्तीही लैंगिक अत्याचार करणारी असू शकते. प्रत्येत स्त्रीला प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क आहे व ती आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची वाच्यता प्रत्यक्ष घटनेनंतर बर्‍याच काळानेही करू शकते. अत्याचार्‍या सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी पीडितेचा हा हक्क दडपला जाऊ शकत नाही.

न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, लैंगिक अत्याचाराने मानसिक धक्का बसलेली स्त्री लोकलज्जेस्तव तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची कदाचित लगेच वाच्यत करणार नाही. पण तिला अशी वाच्यता करण्यास बळकट अशी परिस्थिती दिसल्यावर तिने विलंबाने त्याची वाच्यता केली तर तिचे म्हणणे तेवढ्यानेच खोटे म्हणता येणार नाही किंवा त्यासाठी तिचा दंडितही करता येणार नाही.

अकबर यांच्यासोबत काम केलेल्या गझाला बहाब या आणखी एका महिला पत्रकाराने कोर्टात साक्ष देताना केवळ रामाणी यांच्या आरोपास दुजोरा दिला एवढेच नव्हे तर स्वत:लाही तोच वाईट अनुभव आल्याचे सांगितले. त्यामुळे अकबर यांचा निष्कलंक चारित्र्याचा बुरखा फाडला गेला, या रामाणी यांचा बचावाचा युक्तिवादही न्यायालयाने मान्य केला. आपल्या म्हणण्याचा न्यायालयाने सत्य म्हणून स्वीकार केला, याने मी धन्य झाले आहे. न्यायालयाची मी त्यासाठी आभारी आहे, अशा शब्दांत रामाणी यांनी निकालानंतर आनंद व्यक्त केला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER