तत्त्वनिष्ठेशी तडजोड न करणारे परखड विचारांचे मा. गो. वैद्य

MG Vaidya.jpg

मा. गो. वैद्य यांचे जाणे
प्रख्यात विचारवंत, अत्यंत प्रभावी आणि चिंतनशील संपादक मा.गो.उपाख्य बाबुराव वैद्य यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले वैद्य हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. संघाने जेव्हा पहिल्यांदाच प्रवक्ता हे पद आपल्या रचनेत निर्माण केले तेव्हा पहिले प्रवक्ते म्हणून वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली. विविध क्षेत्रांचा अत्यंत सखोल अभ्यास आणि त्याला असलेली चिंतनाची जोड यातून वैद्य यांचे व्यक्तिमत्त्व घडले. अर्थात त्यामागील संस्कार हा संघाचाच होता. संघाचे पहिले प्रवक्ते कोण असावेत, असा प्रश्न आला तेव्हा वैद्य यांच्याशिवाय दुसरे नाव येणे शक्य नव्हते. वैद्य यांचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये आयुष्यात कधीही अंतर पडले नाही. ते आंतर्बाह्य स्वयंसेवक होते आणि निष्कलंक चारित्र्य हा त्यांचा गुणविशेष होता.

चारित्र्याच्या पातळीवर यत्किंंचितही तोल ढळू न देता सार्वजनिक आयुष्यात आदर्श प्रस्थापित करणारे वैद्य हे अत्यंत स्पष्टवक्ते होते. या स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागली तरी चालेल; पण स्पष्टवक्तेपणा, बाणेदारपणा कायम ठेवायचा हे त्यांचे ब्रीद होते. संघ विचारांबाबत अनेकांचे मतभेद असू शकतात; पण वैद्य यांची संघनिष्ठा वादातीत होती. पत्रकारांच्या प्रश्नांना ते ज्या पद्धतीने उत्तरे देत त्यावरून त्यांचा हजरजबाबीपणा जाणवत असे. एकदा नागपुरातील एका पत्रपरिषदेत एका पत्रकाराने खोचक प्रश्न विचारला. विषय अमेरिकेचा होता. वैद्य उत्तरले, ‘आपला प्रश्न अतिशय उत्तम आहे; पण त्याचे उत्तर जॉर्ज बुश देऊ शकतात; मी नाही. शब्दांवर त्यांची प्रचंड हुकूमत होती; पण या हुकुमतीचा दुरुपयोग त्यांनी कधीही केला नाही. ना तो त्यांनी लिखाणात केला ना बोलण्यात. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून नितीन गडकरी यांना जावे लागले तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती.

वैद्य यांच्या मतांना संघ परिवारात आणि संघाबाहेरील वर्तुळातही तेवढीच किंमत होती. म्हणूनच ते संघाविषयी जेव्हा भाष्य करत तेव्हा जगभरातील मीडिया त्याच्या बातम्या करीत असे. अत्यंत परखडपणे मतप्रदर्शन करताना ते सत्याची कास धरत आणि कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. वैद्य यांची राजकीय घडामोडींवरील विधाने ही सर्वांसाठी औत्सुक्याचा तर काही जणांसाठी धास्तीचादेखील विषय असत. संघाची शिस्तीची चौकट मोडू न देता आपल्या विचारस्वातंत्र्याचा उपयोग करीत बिनदिक्कतपणे मत व्यक्त करणे हा त्यांचा स्थायिभाव होता. त्यांच्या विचारांमध्ये इतकी निकोपता आणि आर्तता होती की, त्या विचारांच्या बावनकशीपणाबद्दल कोणालाही शंका घेता येत नसे.

एक अत्यंत गुणवंत विद्यार्थी, नागपूरच्या नवयुग विद्यालयात शिक्षक, हिस्लॉप कॉलेजमध्ये संस्कृतचे निष्णात प्राध्यापक आणि १९६६ पासून स्वखुशीने स्वीकारलेली पत्रकारिता हा त्यांचा प्रवास विलक्षण होता. त्यांची संघनिष्ठा इतकी प्रखर होती की, आमच्या कोणत्याही प्राध्यापकाने राजकीय विचारांशी बांधिलकी ठेवू नये, असे लेखी देण्याचे फर्मान तेव्हाच्या सरकारने काढले तेव्हा त्यांनी तसे करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. मराठी भाषा शुद्धीबाबत त्यांनी लिहिलेले पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. वापरायचे शब्द आणि न वापरायचे शब्द याची लांबलचक यादी पुस्तकरूपात देऊन त्यांनी भाषाशुद्धीचा अमूल्य असा ठेवा पुढील अनेक पिढ्यांना दिला. आपली संस्कृती (माहितीपर), चांदणे प्रतिभेचे (साहित्य आणि समीक्षा), ठेवणीतले संचित (सदरलेखनसंग्रह), मेरा भारत महान (वैचारिक), रंग माझ्या जीवनाचे (आठवणी), राष्ट्र, राज्य आणि शासन (साहित्य आणि समीक्षा), राष्ट्र संकल्पना आणि श्री गुरुजी (माहितीपर आणि मार्गदर्शनपर), शब्ददिठी शब्दमिठी (माहितीपर), शब्दांच्या गाठीभेटी (माहितीपर), श्री गुरुजी : एक अनौखा नेतृत्व (हिंदी भाषणाचे पुस्तक), सुगम संघ (हिंदी-मराठी, माहितीपर), हिंदू समाज आणि ख्रिस्ती मिशनरी (वैचारिक) ही अत्यंत मोलाची ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. तरुण भारतचे आद्य संपादक ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या सडेतोड, परखड पत्रकारितेचा वारसा वैद्य यांनी चालविला.

संघ विचार आणि वैद्य यांचा जीवनप्रवास या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या, इतके ते संघसमरस झाले होते. १९४८ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली तेव्हा संघावर बंदी आली असता ते वेषांतर करून भूमिगतदेखील राहिले. १९७५ मध्ये संघावर बंदी आली तेव्हा ते तरुण भारतमध्ये होते. आणीबाणीत वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लागू झाली तेव्हा, तरुण भारतच्या डाक आवृत्तीत त्यांनी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिला; पण रात्री पोलीस तरुण भारतमध्ये धडकले आणि अग्रलेख छापण्यास त्यांनी मनाई केली. तेव्हा या दडपशाहीचा निषेध म्हणून शहर आवृत्तीत वैद्य यांनी अग्रलेखाची जागा मोकळी सोडून अभिनव निषेध केला होता.

आणीबाणीच्या काळात त्यांनी ‘नीरद’ या टोपणनावाने लिखाण केले. वैद्य यांच्या संघकार्याचा सार्थ वारसा त्यांची पुढील पिढीही चालवत आहे. त्यांचे पूर्ण कुटुंबच संघकार्याला वाहिलेले आहे. त्यांचे एक पुत्र डॉ.मनमोहन वैद्य हे संघाचे सहसरकार्यवाह आहेत. मा.गो.वैद्य यांच्या निधनाने नागपूर, विदर्भानेच नव्हे तर देशातील संपूर्ण संघ परिवाराने ज्येष्ठ मार्गदर्शक, प्रतिभावंत संघ स्वयंसेवक गमावला आहे. तत्त्वांच्या मार्गावर आयुष्य व्यतीत करणारे एक आदर्शवत व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER