लक्झरी फीवर, एक नवीन संकल्पना

लक्झरी फीवर, एक नवीन संकल्पना

इतक्यातच लक्झरी फीवर ही संकल्पना ऐकण्यात आली .म्हणजे आता सुबत्तेचा शेवटी तापही यायला लागला आहे तर! सुबत्तेचा अतिरेक तुम्हाआम्हा सगळ्यांना दिसतो खरा ! पण त्याचा ताप यावा, म्हणजे एकदमच भारी की हो ! विनोदाचा भाग सोडा. पण हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरा.

दिवाळी (Diwali) तोंडावर आलेली असताना आता मार्केटला गेलो तर सगळीकडे दिव्यांची रोषणाई आणि हळू बाजार सजताना दिसतो आहे.कोरोनामुळे (Corona) आत्तापर्यंत फारसा माल नव्हता पण आता सगळीकडे आलेल्या नवीन मालाची गाठोडी ,बॉक्सेस उघडत दुकानदार दुकान सजवताना दिसतात एकूणच बाजारात चहेल पहेल वाढली आहे. लोकही थोडे भीतीतून बाहेर पडून खरेदीला निघतात आहे.

परवा मॉलमध्ये खूपच सुंदर वस्तू लक्ष वेधून घेत होत्या .तेवढ्यात लक्षात आलं की मध्यंतरीच्या पेंडामिनपिरेड मध्ये आपला काही खर्च झाला नाहीय. जो काही झाला असेल तो फक्त खाण्या-पिण्यावर. लहानपणची आठवण झाली की दररोजच्या वापरायचे प्रत्येकाचे दोनच कपडे असायचे. म्हणजे एक साडी वाळत असलेली आणि दुसरी अंगावर. आणि त्याला” घरात नेसायच्या साड्या घ्यायच्या “असंच म्हणत असत. आजही आपण डेली युज साठीचे ड्रेसेस घेतो ,पण ते दोन नाही घेत. ते आठ दहा तरी लागतात. याव्यतिरिक्त झोपतानाचे वेगळे, जिम किंवा व्यायामाचे वेगळे,आपल्या घरच्या लग्नांमध्ये नेसायचे वेगळे तर दुसऱ्या कडल्या रिसेप्शन आणि तत्सम प्रोग्राम साठीचे वेगळे! ऑफिस साठी फॉर्मल कपडे हवेत, कुठले गाण्याचे प्रोग्राम्स किंवा लेक्चर्स ऐकायला आणखीन वेगळे हवे. यात भर पडते ट्रीप ला जाण्यासाठीच्या विशेष कपड्यांची.

यासंदर्भात मला माझ्या एका छोट्या क्लायंटची आठवण झाली. आजकाल टीव्ही सिरीयल मधून सगळे सण फारच झगमगाटात पार पाडतात . गणपतीचे दिवस आले की सीरियल मध्येही गणपती ,दसरा-दिवाळी चे दिवस आले की सीरियल मध्येही दसरा-दिवाळी आणि ती पण सुंदर सुंदर घरांमधून उत्तम सजावट केलेली दाखवतात. त्यामुळे तो मुलगा एवढा चिडलेला होता. त्यात भरीस भर म्हणजे घरची परिस्थिती बेताची आणि आणि थोडी जुन्या मताची माणसं. त्यामुळे शकुनाच्या पाच पणत्या आणि लक्ष्मीपूजनला थोड्या जास्त असं त्यांचं गणित ! अशी कशी काय दिवाळी असू शकते,दोन चार मिणमिणत्या पणत्या ! त्याच्या झगमगाटाच्या क्रेझ पुढे ती घरची दिवाळी फारच त्याला विचित्र वाटते.

थोडक्यात हे वैभवाच वादळ नक्कीच लक्झरी फीवर निर्माण करणारच ना ? सध्या पैसा म्हणजे सर्वस्व ! पैसा असेल तर सगळं काही एका फोनवर हजर करता येतं ही वृत्ती वाढली आहे..

त्यासाठी या रेट रेस मध्ये पळण अालंच ! तुलनाही आलीचं. मग आमच्या स्टेटस प्रमाणे समाजात सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार .सगळं कसं चांगल्या चांगलं आणि महागात महाग .सगळे सणसमारंभ दिमाखदार! याच सगळ्याला एक नाव आहे Status Anxiety !

आणि अशा स्टेटस एंग्जायटी पसरलेल्या समाजात मात्र सर्वत्र विषमता दिसते. या रचनेला समानता पचणारी नाही .मग काय करायचं? तर सुरुवात स्वतःपासूनच करायची. बरेच पालक विचारतात की मुलांना श्रमाचे महत्त्व कळत नाही , अन् पैशाचही महत्त्व नाहीये हो ..काय करावं समजतच नाही!

मग काय करायचं तर आपल्या काही चांगल्या सवयी असतात त्या जोपासायच्या. अशासाठी चांगल्या सवयी म्हणते की आपल्याला सतत असंच ऐकायची आणि ऐकवायची सवय असते,” तुझं हे खूप वाईट आहे “,”ही सवय तू सोडायला हवी !” “तुझ्या या गोष्टीमुळे सगळ्यांना त्रास होतो.”

कुणाची ही चांगली सवय कुणी सांगतच नाही. म्हणूनच सगळ्यात आधी आपण होकारा पासून सुरुवात करायची. अगदी स्वतःच्या बाबतीत. आपल्या सवयींची यादी करायची. याही ठिकाणी परत चांगल्या किंवा वाईट असं म्हणतात ,त्याऐवजी डॉक्टर नाडकर्णी सर, यांनी उल्लेख केल्याप्रमाणे तारक व मारक असे शब्दप्रयोग वापरायचे. खरच किती छान आहेत हे शब्द ! आपल्याला आयुष्यात मदत करणारे ते तारक आणि ज्यामुळे माझे नुकसान होऊ शकते, प्रगतीला खीळ बसतो ते मारक. ही संकल्पना पूर्णपणे माझ्याशी निगडीत आहे म्हणून ती स्वीकारायलाहि मला आवडते. याउलट चांगले-वाईट हे नेहमी दुसरे ठरवतात .आणि त्याचं लेबल आपल्याला चिटवतात. त्यामुळे कुठलंही काम करण्यासाठी जी आतून उस्फूर्तता ,उत्साह यावा लागतो तो येत नाही. म्हणूनच माझ्या तारक सवयी आता मी ठरवणार .

कुठलीही एक तारक सवय जोपासायची आणि कुठलीही एकच एकावेळी मारक सवय त्यागायची. यातूनच सवयींचा समतोल साधतो. फक्त त्यासाठी प्रत्येक क्षणी संयम आवश्यक असतो आणि वेळेप्रमाणे निग्रहही असावा लागतो. म्हणजे जर आपण एखाद्या शहरातील मोठ्या मॉलमध्ये गेलो. आपल्या पॉकेट मध्ये कार्ड आहे. आणि अनेकविध वस्तू मला दिसत आहेत. आकर्षक कपडे ज्वेलरी चप्पल बॅग आणि इतर. पण मी फक्त विंडो शॉपिंग करतेय. आणि माझा संयम टिकवते आहे. पुढे मी होम डेकोर मध्ये शिरले. यातील वस्तू म्हणजे माझा वीक पॉईंट ! मला मनापासून अनेक वस्तू आवडत आहेत .पण गेल्याबरोबर माझी नजर एका छोट्याशा पितळेच्या नाजूक नक्षीकाम केलेल्या कंदीला वर गेली. त्याला इवलीशी कडी, ती काढून आत दिवा ठेवायचा. किंमतही तुलनेने फार नाही. केवळ .250रू. मी त्या दुकानात दोनदा चक्कर मारली. सगळ्या वस्तू बघितल्या. आणि परत परत कंदीलाकडे येत होते. आणि मी तो कंदील घेतला. मी निग्रह सोडला का? माझं उत्तर माझ्यापुरता” नाही !”. कितीही कपडे ज्वेलरी असली तरी त्याबाबत मोह आवरणे किती अवघड हे सगळ्यांना माहिती आहे. होम डेकोर माझे आवडते असले तरी अनेक महागड्या वस्तूही तिथे होत्या. मी त्या नाही घेतल्या. छोटीशी पण मनापासुन आवडलेली वस्तू मी मात्र निवडली. मनात प्रश्न आला जर किंमत आटोक्यात नसती तर ? तर मी ती घेतली नसती.केवळ योग्य किंमत असल्याने वेळेप्रमाणे मी निग्रहात बदल केलेला आहे तो असा !

पुढचा प्रश्न येतो की चांगली सवय कुठली? जिचे रूपांतर तर व्यसनात होत नाही , जिचा माझ्या कार्यक्षमतेवर, विकासावर, नातेसंबंधांवर ,उत्पादन क्षमतेवर परिणाम होत नाही .आणि अशा सवयी अंगिकारल्यावर गरजा आपोआपच नियंत्रित होतात.

मग जेव्हा खर्च करायची वेळ येते, तेव्हा योग्य खर्च कोणता ? याचा विचार सुरू होतो.एखादी वस्तू घेण्यामागे उद्देश वापरणं आहे की मिरवण? आपल्याजवळ असणं गरजेचं की दाखवणे? म्हणजेच त्यातून आपल्याला समृद्धीचा प्रदर्शन करायचा आहे ?की विकास साधायचा आहे? देण्याघेण्यात भावनेला महत्त्व की स्पर्धेची मानसिकता ?याचा विचार व्हावा.म्हणजेच योग्य खर्च कोणता हे ठरविण्याचे क्रायटेरिया आपल्याला ठरवता येतील.ते पुढील प्रमाणे असू शकतात.

१) एक कार्यक्षमता वाढवणारा

२) आरोग्य वर्धिष्णू करणारा

३) ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारा

४)संस्कृतिक समृध्दी,रसिकता जोपासणारा. या गोष्टींचा विचार व्हावा.

आपल्या जीवनाला आवश्यक,आरोग्याचा समतोल राखला जाईल अशा गरजा पूर्ण होतील असा खर्च.आरोग्यासाठी जिमच आवश्यक ही माझी गरज की क्रेझ? रसिकता जोपासणारा म्हणजे नवीन येणारी प्रत्येक ट्रेंड्स ची ज्वेलरी ? किंवा वस्त्र परिधान पॅटर्न का ? याची उत्तरे आपली आपणच दयायची.

थोडक्यात “निस्सीम भाव उल्ह्यासे,” दोघांनाही संपन्न करतो तो खर्च नाहीच ,तर संपन्न करणारी गुंतवणूक असते.म्हणूनच वेळ,पैसा,गोड भाषा,श्रम मनापासून व उत्साहाने नात्यावर खर्च केलीत तर ती गुंतवणूक आयुष्य पुरेल.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER