जोकोवीचविरुध्द ‘लकी लुजर’ ठरला ‘बिग विनर’

Novak Djokovic - Lorenzo Sonego

कितीही मोठा आणि कितीही यशस्वी खेळाडू असला तरी त्याच्यासाठी एखादा दिवस खराब येतोच. त्यादिवशी त्याची कोणतीच गोष्ट बरोबर होत नसते. जगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोवीचसाठी (Novak Djokovic) बहुधा शुक्रवार, 30 आॕक्टोबर हा तसा दिवस असावा. या दिवशी त्याला इटलीच्या (Italy) लोरेन्झो सोनेगो (Lorenzo Sonego) नावाच्या खेळाडूने पराभवाचा धक्का दिला. व्हिएन्ना (Vienna) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सोनेगोने 6-2, 6-1 असा अनपेक्षित विजय मिळवला.

खरं तर या फरकाने सोनेगो सामना हारेल असे अपेक्षित होते पण झाले उलटेच आणि त्याने थेट जगातील नंबर वन खेळाडूलाच पराभवाचा धक्का दिला. लकी लुजर खेळाडूने 2017 नंतर प्रथमच नंबर वन खेळाडूला मात दिली आहे. 2017 मध्ये क्वीन्स क्लब स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आॕस्ट्रेलियन जाॕर्डन थाॕमसन याने पहिल्याच फेरीत त्यावेळच्या नंबर वन अँडी मरेला मात दिली होती.

जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानी असलेला हा खेळाडू जोकोवीचवर विजय मिळविणारा पहिला ‘लकी लुजर’ ठरला. याआधी जोकोवीचने ‘लकी लुजर’ खेळाडूंविरुध्दच्या आपल्या सर्व 12 लढती जिंकलेल्या होत्या.

खरं तर जोकोवीच यंदा जबरदस्त फाॕर्मात आहे. यंदा त्याने केवळ दोनच सामने गमावले आहेत. फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात राफेल नदालने त्याचा उडवलेला धुव्वा आणि आता सोनेगोने तसाच,उडवलेला धुव्वा….याशिवाय म्हटला तर युएस ओपनमध्ये लाईनवूमनला चेंडू लागल्याने त्याला बाद ठरवलेला चौथ्या फेरीचा सामना हा त्याचा यंदाचा तिसरा पराभव म्हणता येईल.

लकी लुजर म्हणजे हे खेळाडू खरे तर पात्रता स्पर्धेतूनही मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेले नसतात पण मुख्य स्पर्धेतून काही खेळाडूंची माघार वा इतर कारणांनी जागा रिकाम्या राहिल्यास त्यांना संधी देण्यात येते. सोनेगो हा पात्रता स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात स्लोव्हेनियाच्या अल्याझ बेदेने याच्याकडून पराभूत झाला होता आणि काही खेळाडूंनी दुखापतीमुळे माघार घेतल्याने तो मेन ड्राॕमध्ये आला होता.अशी संधी मिळालेल्या लाॕरेन्झो सोनेगोने हा मोठाच उलटफेर घडवून आणला आहे. या दोघांतील ही पहिलीच लढत होती.

पहिल्या सेटमध्येच जोकोवीचच्या फटक्यांमध्ये जान नव्हती. तो पुन्हा पुन्हा चुका करत होता. त्यामुळे तो 0-4 असा मागे पडला होता. पहिल्या सेटमध्ये त्याला सोनेगोच्या सर्व्हिसवर केवळ पाच गूण घेता आले.

दुसऱ्या सेटमध्ये तर ‘जोको’ ला सहा ब्रेक पाॕईंट मिळाले होते पण त्यापैकी त्याला एकाचाही लाभ उचलता आला नाही. आणि उलट पाचवेळा आपला गेम गमावला आणि हार पत्करली. मात्र या पराभवाने तो फारसा विचलीत झालेला दिसला नाही. तो म्हणाला ,” मी अधिकाधिक गूण कमावून वर्षअखेर आपले नंबर वन स्थान पक्के करण्याच्या उद्देशाने येथे आलो होतो. ते माझे उद्दीष्ट्य साध्य झाले म्हणून फार फरक पडत नाही. “

या विजयाबद्दल सोनेगो म्हणतो, ” निश्चितपणे माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्तम विजय आहे कारण नोव्हाक हा जगात बेस्ट आहे. मी आज खूपच छान खेळलो. हा अविश्वसनीय विजय आहे.” त्याचा टॉप टेनमधील खेळाडूवर हा पहिलाच विजय आहे.

सोनेगोचा उपांत्य फेरीचा सामना आता डॕनिएल इव्हान्सशी होईल. इव्हान्सनेही ग्रिगोर दिमित्रोव्हला तीन सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला. आपल्या यंदाच्या पाचव्या विजेतेपदाच्या मार्गावर असलेल्या आंद्रे रुबलेव्हने गतविजेत्या डाॕमिनिक थीमचे आव्हान संपवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER