स्निग्धता – नात्यात व शरीरात खूप महत्त्वाची !

Mouistering Body

स्नेह किंवा स्निग्ध हा गुण शरीराच्या व सर्व नात्यांच्या आरोग्याकरीता खूप महत्त्वाचा. जिथे ओलावा कमी झाला तिथे रुक्षता आलीच समजा. मग सुरु होतं खरखरण, कोरडेपणा, शुष्कता. शरीरात सांध्यांचा आवाज होणे, त्वचेला फाटल्याप्रमाणे रुक्ष होणे, मळाच्या गुठळ्या होणे, केस चेहरा वयस्क वाटणे, निद्रानाश, कृशता अशी लक्षणे शरीरात स्निग्धता कमी झाल्याने निर्माण होतात. म्हणूनच शरीराला गरज आहे स्निग्धतेची स्नेहाची!

स्निग्ध गुण म्हणजे काय तर एखाद्या पदार्थाला ओलसर किंवा तेलीय बनविण्याची शक्ति. मऊपणा, मार्दवता निर्माण करणे म्हणजे स्निग्धगुण. एखाद्या यंत्रात वंगण, तेल घालण्याची गरज का पडते कारण यंत्र घासल्या जाऊ नये त्याचे आयुष्य वाढावे बरोबर ना! मग या शरीररुपी यंत्राला वंगण नको का! स्निग्धता मृदुता आयुष्य वाढविणारे स्निग्ध द्रव्य असतात. शरीराला पुष्ट करणारे, हाडे मजबूत करणारे, वातदोषाला वाढू न देणारे तसेच सप्तधातूंना पोषक स्निग्ध द्रव्य असतात. स्पर्शनेंद्रीय म्हणजेच त्वचेला मार्दवता, बाह्य वातावरणापासून रक्षण करण्याचे कार्य तसेच वर्ण उजळविण्याचे कार्य हे स्निग्ध द्रव्य करतात. स्नेह मार्दवकृत् स्निग्धो बलवर्णकरस्तथा!

स्निग्धता आणणारे पदार्थ कोणते ?

तूप, तेल, वसा (प्राण्यांची चरबी), मज्जा, दूध, लोणी, सहसा सर्व गोड पदार्थ हे स्निग्धच असतात. सर्व स्निग्ध पदार्थामधे तूप श्रेष्ठ आहे. म्हणूनच आपण रोज वरणभात तूप खावे असे म्हणतो. रोजच्या आहारात तूप महत्त्वाचे घेतल्याने स्निग्धता आपोआप मिळत जाते. अर्थात हे तूप वनस्पतीजन्य तूप अपेक्षित नाही.

या सर्व द्रव्यांनी शरीरात स्निग्धता निर्माण होते. स्निग्धता ही आंतरबाह्य दोन्ही स्वरूपात अपेक्षित असते. केसांना तेल लावणे, कानात तेल टाकणे सर्वांगास मालीश करणे हे जसे बाह्य अवयव त्वचा स्निग्ध राहण्याकरीता उपयुक्त आहेत तसेच आहारात योग्य प्रमाणात तेल तूपाचा वापर, दूध लोणी असे पदार्थ घेणे आभ्यंतर प्रत्येक अवयवाला स्निग्ध ठेवण्याचे काम करतात.

आजकाल लो फॅट, नो ऑईल या विचाराने गरजेपुरते आवश्यक तेल तूप घेणे बंद करणारे लोकं आहेत. दुसरीकडे स्निग्ध पदार्थ अति खाणारे लोकं सुद्धा आहेत. अतिप्रमाणात व सतत गोड तेलकट तूपकट दूग्धजन्य पदार्थ घेतल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदरोग, अतिनिद्रा, आळस, दमा, थायरॉईड, अंग जड वाटणे, कफाचे विकार होतात.

म्हणूनच स्निग्ध गुण आयुष्यात खूप महत्त्वाचा. कमी झाला तरी आयुष्य रुक्ष करणार पण अति मात्रेत घेतला की नाती व शरीर ओशट करणार. अशा या स्निग्ध गुणावर योग्य मात्रेत योग्य नियंत्रण ठेवणे गरजेचे जेणेकरून शरीररूपी यंत्र न कुरकुरता चालेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER