भाजप-शिवसेनेतील निष्ठावान लोक माझ्या संपर्कात; जयंत पाटील यांचा दावा

Jayant Patil

नागपुर :पुरोगामी विचारांचा आदर्श ठेवून शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही राज्य करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले. शिवस्वराज्य यात्रेतील तिसरा टप्पा विदर्भात असून आज नागपुरात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे  दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

आज दीक्षाभूमीतून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील सर्व वंचित घटकांना राष्ट्रवादी व काँग्रेससोबत येण्याची प्रेरणा मिळू दे, असे विचार पाटील यांनी व्यक्त केले. वंचित समाजासाठीच काम करू. त्यात वंचित घटकांना समान उत्तम न्याय देऊ. आमच्या पक्षातील लोक सेना – भाजपत जात आहेत; परंतु सेना – भाजपत गेली तीन – चार वर्षे निवडणूक लढवण्याकरिता काम करत आहेत, असे लोक दुखावले आहेत. ते लोक माझ्या संपर्कात आहेत. त्यांची नावे जाहीर करणार नाही. कारण मुख्यमंत्री साम-दाम-दंड भेदाचे सूत्र वापरण्यात माहीर आहेत.  त्यामुळे योग्य वेळी नावे जाहीर करू, असेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासमवेत खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सूरज चव्हाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.