भारतीय संघाच्या नावावरील एक डाग पुसला गेला…

Maharashtra Today

भारतीय क्रिकेट (Team India) संघ गेल्या डिसेंबरातील अॕडिलेड (Adelaide) कसोटीत फक्त 36 धावात बाद झाला होता. आॕस्ट्रेलियाविरुध्दच्या त्या नामुष्कीने भारतीय संघाची भरपूर नाचक्की झाली होती कारण आॕस्ट्रेलियातील प्रथम श्रेणी क्रिकेटमधील यंदाची ही सर्वात कमी धावसंख्या होती.

यंदा आॕस्ट्रेलियात कोणताही स्थानिक संघ किंवा परदेशी संघ यापेक्षा कमी धावांत बाद झालेला नव्हता. त्यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कांगारुंना त्यांच्याच मैदानांवर मात देत कसोटी मालिका जिंकली हा भाग वेगळा पण आॕस्ट्रेलियात यंदा सर्वात कमी धावात बाद झालेला संघ हा ‘बट्टा’ टीम इंडियाच्या नावावर लागला होताच.

सुदैवाने आता काही महिन्यातच तो डाग पूसला गेला आहे कारण शेफिल्ड शिल्ड (Sheffild shield) स्पर्धेच्या होबार्ट येथील सामन्यात आता न्यू साउथ वेल्सचा (New South wales) संघ भारताच्या 36 पेक्षाही कमी धावात बाद झाला आहे. टास्मानियाच्या (Tasmania) गोलंदाजांनी न्यू साउथ वेल्सचा डाव अवघ्या 32 धावांतच गुंडाळला आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनमधील भारताच्या नावावरचा निचांक आणखी खाली घसरुन आता न्यू साउथ वेल्सच्या नावावर आलाय.

आॕस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात 1887-88 नंतर पहिल्यांदाच एका मोसमात दोनवेळा 40 पेक्षा कमी धावात संघ बाद झाले आहेत.

विशेष म्हणजे न्यू साउथ वेल्सचा संघ शेफिल्ड शिल्डचा गतविजेता आहे. त्याच न्यू साउथ वेल्सला 32 धावात गुंडाळताना जॕक्सन बर्ड याने 10 षटकात 18 धावात 7 गडी बाद केले. पीटर सीडलने एक व सॕम रेनबर्डने एक गडी बाद केला तर न्यू साउथ वेल्सचा सीन अबॉट हा जखमी असल्याने फलंदाजी करू शकला नाही. फक्त 19.3 षटकांत आटोपलेल्या न्यू साउथ वेल्सच्या डावात त्यांचा कर्णधार पीटर नेव्हिल हा सर्वाधिक 10 धावा करुन नाबाद राहिला. तोच एकटा दोन आकडी धावा करु शकला. चार फलंदाज शून्यावर बाद झाले.

शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील ही चौथ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या आहे. याच्याआधी साउथ आॕस्ट्रेलियाच्या 27 (1955), साउथ आॕस्ट्रेलियाच्याचा 29 (2004) आणि व्हिक्टोरियाच्या 31 (1907) या सर्वात कमी धावसंख्या होत्या. योगायोगाने या पहिल्या तिन्ही निचांकी धावसंख्या सिडनी येथे नोंदल्या गेल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER