लो बजेट पण बिग हिट

Movies

चित्रपटाची कथा जर चांगली असेल आणि ती कथा जर पडद्यावर दिग्दर्शकाने उत्कृष्टपणे मांडली असेल, कलाकारांनी जीव ओतून अभिनय केला असेल तर, तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवतो. मग तो चित्रपट तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून भव्य दिव्य चित्रपट तयार करा किंवा अत्यंत लो बजेटमध्ये चित्रपट काढा. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तसा चित्रपट असेल तर तो नक्कीच यशस्वी ठरतो. बॉलिवूडमध्ये प्रचंड खर्च केलेले नामवंत कलाकार असलेले चित्रपट पडले. तर नवे कलाकार असलेल्या लो बजेट चित्रपटांनी मात्र कोट्यावधींच्या उड्या मारल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशाच काही लो बजेट पण बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरलेल्या चित्रपटांवर एक नजर-

दोन वर्षांपूर्वी श्रीराम राघवन दिग्दर्शित अंधाधुन चित्रपट आला होता. श्रीराम राघवन हा रामगोपाल वर्माचा सहाय्यक होता. रहस्यमय चित्रपट बनवण्यात त्याचा हातखंडा आहे. 2010 च्या एका फ्रेंच लघुपटावर आधारित या चित्रपटात त्याने आयुष्मान खुराना, राधिका आपटे आणि तब्बू यांना मुख्य भूमिका साकारण्यासाठी घेतले. या चित्रपटाचे बजेट फक्त 32 कोटी रुपये होते. शेवटपर्यंत रहस्य टिकवून ठेवलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली होती. या चित्रपटाने केवळ देशातच 441 कोटी रुपये कमवले आहेत तर चीनमध्ये या चित्रपटाने 335 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराघरात शौचालयाची योजना सुरु केली होती. याच योजनेचा प्रचार करण्यासाठी टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपट तयार करण्यात आला. श्रीनारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य नायक म्हणून अक्षयकुमारला घेण्यात आले होते. नायिका म्हणून भूमी पेडणेकरची निवड करण्यात आली, सामाजिक विषयावर आधारित या चित्रपटाचे एकूण बजेट फक्त 18 कोटी रुपये होते. मात्र सामाजिक विषय असतानाही दिग्दर्शकाने हा विषय अत्यंत मनोरंजक पद्धतीने मांडला. प्रेक्षकांना ही वेगळी प्रेमकथा खूपच आवडली आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळजवळ 212 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

दिग्दर्शक अमर कौशिकने हॉरर कॉमेडी जॉनरचा मार्ग निवडत स्त्री नावाचा एक अत्यंत उत्कृष्ट चित्रपट तयार केला होता. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर अभिनीत या चित्रपटात स्त्रीशक्तीची कथा मनोरंजक रुपात मांडली होती. चित्रपटात अपारशक्ति खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. चित्रपटाचे एकूण बजेट फक्त 23 ते 24 कोटी रुपये होते तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींच्या आसपास व्यवसाय केला होता.

असाच एक वेगळ्या विषयावरचा चित्रपट होता बधाई हो. बॉक्स ऑफिस वर या चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षित केले आणि कमाईचा विक्रम केला. अमर शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात घरात दोन मोठी मुले असतानाही, त्यापैकी एका मुलाच्या लग्नाची चर्चा घरात सुरु असताना त्यांची आई पुन्हा गरोदर राहते. त्यानंतर केवळ घरातच नव्हे तर नातेवाईकांमध्ये आणि समाजामध्येही या गरोदर बाईला ज्या काही समस्यांचा सामना करावा लागतो ते अत्यंत मनोरंजक पद्धतीने पडद्यावर मांडण्यात आले होते. आयुष्मान खुराना, नीना गुप्ता, गजानन राव, सान्या मल्होत्रा अभिनीत या चित्रपटाचे बजेट 29 कोटी रुपये होते तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 221 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा व्यवसाय केला होता.

गुलजार यांची मुलगी मेघनाने बॉलिवूडमधील नव्या दमाची लोकप्रिय नायिका आलिया भट्टला घेऊन राजी चित्रपट प्रेक्षकांपुढे आणला होता. एक भारतीय मुलगी पाकिस्तानात जाऊन तेथे जीवावर उदार होऊन भारतासाठी हेरगिरी करते अशी या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटाचे बजेट आलिया आणि पाकिस्तानची वातावरण निर्मिती करायची असल्याने 40 कोटी रुपयांवर गेले होते. या चित्रपटाने वर उल्लेख केलेल्या चित्रपटांपेक्षा राजीचा व्यवसाय तसा कमीच आहे. पण एकूण बजेट पाहाता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 207 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

मराठीतील प्रख्यात लेखक अनिल बर्वे यांचा मुलगा राही अनिल बर्वे आणि त्याचा मित्र आनंद गांधी यांनी हॉरर चित्रपट तुंबाड सादर केला होता. राही आणि आनंदनेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुंबाडचे बजेट फक्त 5 कोटी रुपये होते. सोहम शाह, रोहिणी चक्रवर्ती अभिनीत हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आकर्षित करीत आहे. या चित्रपटाने एकूण 13 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. याशिवाय इरफान खान अबिनीत पान सिंह तोमर, विद्या बालन अभिनीत कहानी चित्रपटांचाही येथे उल्लेख करणे आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER