मटण खाण्यासाठी वाट्टेल ते !

Manikraj Pawar

आपल्या आवडत्या कलाकारांना काय आवडतं हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नेहमीच असते. विशेष म्हणजे पडद्यावर जे कलाकार आपल्याला प्रचंड आवडतात त्यांच्या सोशल मीडिया (Social Media)पेजवर क्लिक करून त्यांची माहिती काढण्यासाठी अनेक नेटकरी चाहते धडपडत असतात. कलाकारांनाही या गोष्टी शेअर करायला आवडते. सेलिब्रिटी आणि त्यांचे फॅन्स यांच्यात ही जुगलबंदी सुरूच असते. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील डॅशिंग पोलीस रणजित ढाले पाटील यानेही त्याची खवय्येगिरीची एक आठवण शेअर केली आणि मग काय त्याच्या चाहत्यांना कळाले की मणिराज मटण खाण्यासाठी किती खवय्या आहे. मटण आवडतं हे शेअर केल्याचा मणिराजलाही इतका फायदा झाला आहे की जेव्हा कुणी चाहते, प्रेक्षक त्याला भेटतात, सेटवर गप्पा मारायला येतात तेव्हा मटण खायला येण्याचे निमंत्रण देतात. त्यामुळे मणिराजला या मालिकेच्या निमित्ताने मिळालेल्या प्रसिद्धीचा फायदा चांगलाच झाला आहे.

मणिराज पवार (Manikraj Pawar) या नावाने वर्षभरापूर्वी टीव्ही इंडस्ट्रीत आलेल्या या डॅशिंग व्यक्तिमत्त्वाने रणजित ढाले पाटील ही भूमिका इतकी चपखल निभावली आहे की आता रणजित हीच त्याची ओळख बनली आहे. आणि साहजिकच त्यालाही या नावाने ऑफस्क्रीन बोलवणारे चाहते आवडू लागले आहेत. सध्या या मालिकेचे चित्रीकरण सांगलीमध्ये सुरू आहे. सांगलीत मालिकेचा सेट लागला असला तरी आउटडोअर शूटिंगसाठी मणिराज जेव्हा सांगली परिसरातील हरिपूर, कृष्णाकाठच्या भागात जातो तेव्हा त्याला भेटायला येणाऱ्यांपर्यंत ही बातमी पोहचलेली असते की मणिराज मटण खाण्यासाठी खूप वेडा आहे. काही वेळा त्याला त्याच्या सांगलीकर चाहत्यांनी मटणाची डीश खास आणूनही दिली आहे.

मणिराज मूळचा येवल्याचा आहे. येवल्याची पैठणी आपल्याला माहिती आहेच. मणिराजलाही त्याच्या शहराचा, पैठणी बनवणाऱ्या कारागिरांचा खूप अभिमान आहे. थिएटर या विषयातून मणिराजने एम. ए. ची पदवी घेतल्यानंतर काही नाटकांमध्ये काम केलं. अभिनयातच करिअर करायचं हे ठरवून त्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्याला ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेची ऑफर आली आणि त्याचं जगच बदलून गेलं.

मणिराजला विविध शहरांमध्ये भटकंती करायला खूप आवडतं; पण त्याचबरोबर मटण हा पदार्थ वेगवेगळ्या शहरांमध्ये कसा बनवला जातो हे जाणून घ्यायला आणि त्यावर ताव मारायला खूप आवडते. आजपर्यंत तो ज्या ज्या शहरामध्ये फिरायला गेला आहे तेथील मटणाची चव चाखल्याशिवाय तो परतीचा प्रवासच करत नाही. कोल्हापूरचे झणझणीत मटण, विदर्भ-मराठवाड्यातील सावजी मटण, सांगली-साताऱ्यातील काळ्या मसाल्यातील मटण तर त्याला आवडतेच; पण विविध प्रदेशांतील मटण करण्याची पद्धत आणि चव हा त्याचा वीक पॉइंट आहे. बाइकस्वारीचाही त्याला खूप छंद असून रिकामा वेळ मिळाला की बाइकला किक मारायची आणि फिरायला जायचे, मटण खायचे यासाठी मणिराज क्रेझी आहे. ऐतिहासिक स्थळांवर फिरायलाही मणिराजला आवडतं.

नाशिकमधील येवल्यातील जन्म असला तरी मणिराजचे बालपण औरंगाबादमध्ये गेले आणि शिक्षणासाठी त्याने पुण्यातील ललित कला केंद्र गाठले. अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत असतानाच त्याने ‘आनंदाची बातमी’ हे नाटक स्वत: लिहून दिग्दर्शितही केले होते. ललित कला केंद्रातील प्रवेश हा आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे असेही मणिराज सांगतो. व. पु. काळे यांच्या पुस्तकांचा मणिराज खूप चाहता आहे.

मणिराजला जसे त्याच्या मटण खाण्याच्या आवडीवरून चाहते संपर्क साधतात तसेच त्याच्या दिलखुलास स्माइलवर मुली फिदा आहेत. त्याच्या सोशल मीडियावरील पेजचा कमेंट बॉक्स, ‘तुमचे स्माइल खूप छान आहे’ याच कमेंटने भरलेला असतो. मालिकेतील संजीवनीसोबत त्याची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडत असून सध्या त्यांच्या फॅन्सकडून ‘रणजीवनी’ हे नावही त्यांना मिळाले आहे.

ही बातमी पण वाचा :  शुभांगीताईकडून शिवानीला मिळाली ड्रेसची गिफ्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER