प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं…

Valentine's Day Editorial

Shailendra Paranjapeव्हँलेन्टाइनव्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा झाला आणि बाजारपेठेत फुलांचे भाव वाढले. अर्थात, मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर चालणाऱ्या बाजारपेठेत हे अपेक्षितही होतेच. आपापले प्रेम विविध प्रकारे व्यक्त करणारे प्रेमवीर योग्य वयात प्रेमात पडतात, त्यांच्या अवतीभोवतीचं विश्वच बदलून जातं आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरतो. तो आनंद असतो प्रेमाचा. हे तरुण वयात घडलं तर ठीक; पण तरुण वयातच कौटुंबिक जबाबदाऱ्या अंगावर पडलेल्यांना प्रेमबिम करायला वेळच मिळत नाही. त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून झाल्या की प्रेम करायला वेळ मिळतो. काहींचे प्रेम करायच्या वयातच लग्न होऊन जाते आणि ताटात पडेल ते प्रेम अशी त्यांची प्रेमाची व्याख्या होते.

लिव्ह इन रिलेशनशिप नावाच्या नव्या प्रकारामुळे काही जण लग्नाच्या बेडीत न अडकता निरंतर प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतात तर काही जणांना आयुष्याचा जोडीदार अचानकपणे अर्ध्या संसारातून उठून गेल्यामुळे नवा जोडीदार शोधण्याची वेळ येते. संध्याछाया भिवविती हृदया, असं वय आणि त्या वयात काही दुखलं खुपलं तर आपलं म्हणून कोणी तरी असावं, या विचारानं अनेक ज्येष्ठांनी आयुष्याच्या उत्तरार्धात नवा व्हॅलेंटाईन शोधल्याचंही दिसून येतं. समाजात कालानुरूप मूल्य आणि चांगल्या वाईटाच्या संकल्पना बदलत जातात. निकषही बदलत जातात. त्यामुळे १९५०च्या दशकात जे अश्लील मानलं जात होतं ते ३० वर्षांनंतरच्या चित्रपटातून सर्रासपणे समोर येऊ लागलं.

पूर्वी ओढणी सरकली म्हणून ए प्रमाणपत्र दिलं गेल्याचं चित्र होतं तर आता फक्त ओढणीवरच नायिका दिसली तरी चित्रपट यू कॅटेगरीतलाच असतो. कालाय तस्मै नमः, दुसरे काय. हीच गोष्ट प्रेमाच्या बाबतीतही होत गेलीय. चाळीस वर्षांपूर्वी एखाद्या मुलीकडून महाविद्यालयात नोट्स मागण्याचं धारिष्ट्य असलेला तरुण बोल्ड समजला जायचा. आता पाच वर्षांची मुलं शाळेत जोड्या ठरवून टाकतात आणि शी इज माय गर्ल, असं म्हणत एकमेकांशी भांडतातदेखील. विविध वयात होणाऱ्या जाणिवांबद्दल जग जरा पुढं गेलेलं असलं तरी अंगात वारू भरून हुंदडायचं महाविद्यालयीन वय काही फार अलीकडे आलेलं नाही. त्यामुळेच महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये व्हॅलेंटाईन डेचं प्रस्थ तुलनेनं जास्तीच दिसतं. प्रेम करायला वयाचं बंधन नसतं. प्रेम कुणावरही करावं, अशी मंगेश पाडगावकरांची कविता प्रसिद्ध आहे. ती कविता जीवनाचं मांगल्य उदात्त गोष्टी दाखवणारी आहे. पण प्रस्तुत लिखाणात उदात्तता न आणता फक्त आणि फक्त व्हॅलेंटाईन डे आणि प्रेम इतकेच करू इच्छितोय. वृत्तपत्रांमधून बातम्यांमधेही व्हॅलेंटाईन डेनिमित्त पुण्यात काही कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, हे समजले.

त्या सर्व कार्यक्रमांमधून लक्ष वेधून घेतले ते केवळ परस्परांच्या प्रेमात पडल्याने जात, पंथ, धर्म वगैरेचा विचार न करता आणि सर्व पातळ्यांवरचे विरोध सहन करून यशस्वीपणे विवाहबंधनात अडकून संसाराचा गाडाही यशस्वीपणे हाकता येतो, असं सिद्ध केलेल्यांनी एकत्र येऊन संस्था स्थापन केल्याची बातमी. या सर्वांनी एकत्र येत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमात पडलेल्यांना त्यांचं प्रेम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा विडाच उचललाय. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच विवाह अभ्यास मंडळ या नावाने संस्थेचे कार्य ही मंडळी सुरू करत आहेत. सरकारी अधिकारी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातले उच्चपदस्थ तसेच काही डॉक्टर्स यांनी आपापली प्रेमप्रकरणे सर्व प्रकारचे विरोध दूर करत विवाहाच्या बंधनापर्यंत पोहचवली आणि त्यांनी यशस्वीपणे संसारही केलेले आहेत. ही सर्व मंडळी इतरांचे प्रेमप्रकरण सफल व्हावे म्हणून मार्गदर्शन आणि मदतही करायला सिद्ध झाले आहेत.

तरुण-तरुणींना प्रेमविवाह या विषयात सर्व प्रकारचे मार्गदर्शन विवाह अभ्यास मंडळाच्यावतीने केले जाणार आहे. कधी काळी आम्ही प्रेम केले आणि ते करताना अर्थातच जातपात, धर्म, पंथ बघितला नाही. त्यामुळे विरोधाला तोंड द्यावे लागले. त्यातूनच अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागलं. काळ बदलला तरी जातीपातीच्या भिंती कायम आहेत, आंतरधर्मीय विवाहाबद्दल तर फारच कटु प्रतिक्रिया दिल्या जातात. अशा संदर्भात विवाह अभ्यास मंडळ प्रेमवीरांना मार्गदर्शन सल्ला आणि मदतही करणार आहे. चार-पाच दशकांपूर्वी पुण्यामध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह चळवळीनं मूळ धरलं होतं. त्यावेळी आम्ही पत्रिका बघणार नाही तर रक्तगट बघू, विवाह करताना ३६ गुण नाही तर स्वभाव जुळणे महत्त्वाचे, यासह विविध प्रकारच्या स्लोगन्स लिहिलेले फलक विवाहाच्या वेळी डिस्प्ले करत ही लग्नं होत. सामाजिक अभिसरणासाठी ती आवश्यकही आहेत. त्या चळवळीला विवाह अभ्यास मंडळाच्या निमित्ताने पुन्हा बळ मिळालं तर व्हॅलेंटाईन डे कारणी लागेल.

शैलेंद्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER