कॉलेजमधलं प्रेम लॉकडाऊनमध्ये झालं लॉक

archana nipankar

मराठी सिनेमा, मालिका इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या लग्नाविषयी नेहमीच उत्सुकता असते. सध्या ते कोणाला डेट करत आहेत, कोणाच्या नावाची अंगठी त्यांनी बोटामध्ये घातलेली आहे, कोणासोबत ते सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं.

सध्या सिंगिंग स्टार या शोमध्ये जिच्या आवाजाची जादू आहे अशी अर्चना निपाणकरने तिच्या लग्नाची गोष्ट दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सांगितली. अर्चनाने प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. नाशिकमधल्या कॉलेज कॅम्पसमध्ये (College Campus) जडलेलं प्रेम लग्नाच्या निमित्ताने कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये लॉक (Lockdown lock) झाले असे सांगत तिने नवरा पार्थसोबतच्या नात्याच्या अनेक आठवणी ओठावर आणल्या.

‘का रे दुरावा’ या मालिकेमध्ये जुई ही भूमिका साकारणाऱ्या अर्चनाचा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश झाला. या मालिकेमध्ये तिची भूमिका थोडीशी ग्रे शेडची होती; पण तरीदेखील तिने चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर ‘राधा प्रेम रंगी रंगली’ (Radha Prem Rangi Rangali) या मालिकेतही अर्चनाने खलनायिका भूमिका साकारली. विशेष म्हणजे तिच्या पहिल्या दोन्ही मालिकांत अर्चना दोघांमध्ये तिसरी अशीच व्यक्तिरेखा साकारत असल्याने तिला यापुढे अशाच भूमिका चालून येत होत्या. मात्र आता खलनायिका न करता काहीतरी वेगळं करायचं म्हणून तिनं ब्रेक घेतला.

सध्या सिंगिंग स्टारमध्ये अर्चना गाते आहे आणि परीक्षकांचा कौलही मिळवला आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोना (Corona) काळातील लॉकडाऊनचा फटका सगळ्याच क्षेत्राला बसला तसा सांस्कृतिक क्षेत्रालाही बसला. त्या काळामध्ये अनेक अशा जोड्या होत्या ज्यांनी त्यांच्या लग्नाचे प्लान केले होते; मात्र त्यांनी सगळ्यांनी आपल्या लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलला. कोरोना संपल्यानंतर लग्न करू असा निर्णय घेतला. अर्चना आणि पार्थ यांनीही डिसेंबरमध्ये लग्न करण्याचं ठरवलं होतं; मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांनी दोनाचे चार हात केले त्याला कारणही भन्नाट आहे.

या दोघांचे प्रेम हे नाशिकमधील कॉलेजमध्ये जुळलं होतं. अनेक वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखतात. तिने आणि पार्थनी लॉकडाऊनमध्ये लग्न का केलं, असा प्रश्न त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून आणि मित्र परिवाराकडून विचारला गेला.

अर्चना सांगते, खरं तर जेव्हा मी आणि पार्थने लग्न करायचे ठरवले तेव्हा पार्थची पहिली अट होती की, लग्नाचा खूप डामडौल करायचा नाही आणि कमी लोकांमध्ये लग्नसोहळा झाला पाहिजे. हा विचार मला पटला. त्या दृष्टीने जानेवारीमध्ये आमचा साखरपुडा झाला तेव्हा मी डिसेंबर २०२० मध्ये लग्न करण्याचा निश्चय केला. मात्र कोरोनाची परिस्थिती डिसेंबरपर्यंत पूर्णपणे निवळेल अशी शक्यता आम्हाला वाटली नाही. मग एका पॉइंटवर आम्ही ठरवलं की, आपल्या दोघांनाही जर कुठलाही फार मोठा सोहळा न करता लग्न करायचं आहे तर मग आत्ताच का करू नये?

म्हणूनच आम्ही लॉकडाऊनमध्ये अत्यंत मोजक्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या साक्षीने लग्न केले. लग्न झाल्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये सिंगिंग स्टार या शोची घोषणा झाली आणि तिला मुंबईला यावे लागणार होते. त्यामुळे त्यांचा संसार लग्नानंतर आठवड्याभरातच नाशिकहून मुंबईमध्ये शिफ्ट झाला. अर्चना सांगते, मी खूप बिझी आहे तर पार्थचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. लग्नानंतर एकमेकांना वेळ देण्यासाठी प्लान केले जातात; परंतु माझं शूटिंग लग्नानंतर लगेच सुरू झाल्यानंतर मी तेवढा वेळ देऊ शकत नाहीय. पण हा शो संपल्यानंतर नक्कीच आम्ही एकमेकांसाठी खूप वेळ काढू. आता एकत्र आल्याचा आनंद खूप मोठा आहे. लग्नानंतर लगेचच मी सिंगिंग स्टारच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले आणि त्याच वेळेला मला न सांगता पार्थला सेटवर बोलवलं गेलं होतं आणि ते सरप्राईज मला खूप छान वाटलं होतं. तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही, असंही ती सांगते.

ही बातमी पण वाचा : कानुल्यासाठी काय वाट्टेल ते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER