प्रेम कुणावरही करावं…!

प्रेम कुणावरही करावं

हाय फ्रेंड्स ! कालच्या लेखात आपण जपानी कला किंत्सू कोराई बद्दल बघितलं. मतितार्थ असा होता की आकर्षक चिनी मातीची भांडी जर तडकली, ती सोन्याच्या द्रावणाने जोडली जातात. एखादा चा तुकडा पडला असेल तर तो सोन्याने भरला जातो ,की ज्यामुळे ते भांडे पूर्वीपेक्षाही झळाळून उठते. मन आणि नाती ही अशीच असतात .कितीही हॅण्डल विथ केअर केली तरीही कधीतरी भावनेच्या भरात शब्दाला शब्द वाढवून, कधी नकळत, तर कधी एखाद्या वाक्याच्या फटकाऱ्यानेही पार तडकतात. पण म्हणून सगळं संपत का? मुळीच नाही .तर ही नाती जोडण्याचे किंत्सूकोराई चे तंत्र वापरायला लागते. मग नात्यांमधील सोन्याची झळाळी आणखीनच उजळून निघते.

यावर क्षमा करणे,लेट गो करणे व विनाअट स्वीकार हे जरी करायचं ठरवलं तरी एक तर ते सोपं नाही.

परंतु” लव इज समथिंग इफ यू गिव इट अवें, यु एंड अप हॅविंग मोअर !”प्रेम दिल्याने वाटतं. अमेरिकन लोकगीतकार मालवीना रेनॉल्ट यांचं हे गाणं वैश्विक सत्य आहे. आणि त्याला काळ वेळ रक्ताची नाती देश, यांच्या सीमा नाहीत. कुठलेही नाते दुखावले गेले तर तर त्यावरची फुंकर, मलम पट्टी म्हणजे हे प्रेम आहे.

म्हणूनच फ्रेंड्स! मला वाटतं की माझी किंतसुकोराई हे प्रेम आहे. आणि ते कुणावर करावं याबाबत कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे प्रेम कुणावरही करावं .जीवनातील प्रेमाचं अनन्यसाधारण स्थान दाखवते सांगतात ,”प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव.”

प्रेमाच्या लाटा अनुभवायला हव्या असतील तर फक्त त्या सागरात शिरकाव करायला हवा .प्रेमा तुझा रंग कसा? असं विचाराल तर मला वाटतं, अनंत अनोख्या रंगछटा या प्रेमाला आहेत .काहीही आवडणं, कशाचाही ध्यास ,कशातही वेड यालाही आपण प्रेमच म्हणू शकतो .खूप लोकांचा आपल्या कामावर प्रचंड प्रेम असतं .आपल्या कार्याला वाहून घेतात .मारुती चितमपल्ली यांचे जंगल प्रेम, परसबाग फुलवण्याचा प्रेम, तत्वज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी वाहून घेणे ,छोट्या छोट्या वस्तूंच्या खरेदीची आवड असो ,की प्रवासाची ,ओरीगामी बनवण्याची असो, जुन्या कपड्यातूनतून नवीन घडवण्याची तर कुणाला कोंड्याचा मांडा करण्याची असो. हे वेडे आपापल्या वेडात मश्गुल असतात. एका मैत्रिणीकडे तिच्या घरी गेल्यावर प्रत्येक वस्तू वाद्यांच्या आकारच दिसते मग अगदी बेडशीट्स असो किंवा किचेन!

शुद्ध प्रेमाला वयाचे ना काही परतफेडीत मिळविण्याचे बंधन. प्रेम व्यक्त करण्याच्या प्रेमाच्या पद्धती ही अनेक! कधी प्रेम शब्दातून, तर कधी स्पर्शातून, कधी चेहऱ्यावरून, तर कधी हावभावातून कधी प्रेमळ हास्यातून, नजरेतून ,कृतीतून व्यक्त होते. वस्तुरूप प्रतीके हीसुद्धा एक पद्धत!

बरेच पुरुष मंडळींना प्रेम शब्दात व्यक्त करायला आवडत नाही. पण त्यांची एखादी कृती किंवा नजरेतून हावभावातून ते समजून घ्यावे लागते. माझी एक छोटी मैत्रीण तिला वाढदिवसाला गिफ्ट आणावी नवऱ्याने असं वाटतं. एक-दोन वेळा आणलेले गिफ्ट तिला आवडले नाहीत. एकदा तिने गुलाब वगैरे सुचवले ते त्याने आणले .त्याला स्वतःचं असं काही सुचत नाही याबाबत तिची तक्रार!

किंवा बऱ्याच घरांमधून प्रेम शब्दातून व्यक्त करण्याची पद्धतच नसते .काही ठिकाणी वस्तूच्या देणे घेण्यातून प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते .ती एक चांगली पद्धत आहे. त्याच वस्तू किती मोठी याला महत्त्व नसतं किंवा नसावं असं मला वाटतं.

मनस्वी तिच्या आईच्या मैत्रिणीकडे नेहमी जाते .आता आई तर नाही. मावशी अजून आहे. तिला खरेदीची प्रचंड आवड.तरुणपणी तेवढ्यातल्या तेवढ्यात पैसे बाजूला काढून ती खरेदी करायची. खरेदी एवढी आवडती, आता वय झाल्यावर ती मुलांना म्हणजे की माझी अंतयात्रा मार्केटमधून जरूर काढा. त्यावर मुलेही गमतीने म्हणतात की ,नाही रे बुवा !तू तिथेही पटकन उठून बसशिल. आता मावशी आजारी असते. फिरू शकत नाही. तिला खूप खंत वाटते .त्यावेळी मनस्वी एखादी छोटीशी युनिट वस्तू खरेदी करून तिला देते. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा मनस्वी ला प्रचंड आनंद दिसतो. मनस्वी म्हणते की या वयात मी तिच्यासाठी आणखीन काय देऊ शकते? तेवढेच दोन सुखाचे क्षण तिच्या आयुष्यात. असही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत!

दादाला मुलगी दाखवायला आलेली होती .आईला सून पाहताक्षणी आवडली .आईने स्वयंपाक घरातूनच दादाला हावभावातून करून मुलगी छान आहे हे सांगितले होते. त्यावेळी तिच्या चमकत्या डोळ्यातून तिचे भावी सुने बद्दलचे कौतुक ओसंडून वाहत असलेले मला अजूनही आठवते.

एखाद्याला आवडतो तो पदार्थ त्याच्यासाठी लावून ठेवणे,म्हणजे काढून ठेवणे मुद्दाम करून डब्यात नेऊन देणे याला तर आपण डबा प्रेम म्हणतोच की! आयुष्यात काय दु:खद प्रसंग असे असतात की त्या वेळेस सांत्वन करायला शब्द अपुरे असतात अशावेळी प्रेमस्पर्श वा प्रेमाची सोबत गरजेचे असते.

असे हे प्रेम देण्याने कमी न होता वाढतच आणि याचा अनुभव घ्यावा लागतो हे प्रेमाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळत असतं आणि असावं.

मुलांचे लाड बेशिस्त हे एक नाही. लाड व्यक्त करण्यासाठी हवे ते देण वा वागू देण नाही. पियू प्रेम आणि शिस्त हे उलट उत्तम समीकरण आणि कॉम्बिनेशन आहे असं आपल्याला म्हणता येईल.लहानपणी प्रेम मिळालेली मुले मोठेपणी इतरांवर प्रेम करू शकतात. अनाथाश्रमातील व घरात राहणाऱ्या मुलांवर एक संशोधन केले गेले. मेंदूची वाढ ,भाषाविकास ,जाणवणारी सुरक्षितता याबाबत या दोघांमध्ये खूप फरक आढळला.

म्हणूनच त्रोटक संभाषण व व्यवहारा पुरते नाते ,आपल्या दुरावलेल्या नात्यांना जोडण्याचे व सजवण्याचे काम तर करूच शकणार नाही. प्रत्येकाची किंतासूकोराई आपल्यासाठी आपणच शोधायला हवी. मला तरी स्वतःला माझी कींत्सू कोराई या अनलिमिटेड प्रेमाच्या छटांमध्ये सापडली आहे. तुम्हाला ? नक्की कळवा.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER