
लखनौ : उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) रेंजमधील चार जिल्ह्यांत मशिदींच्या लाऊडस्पीकरमुळे होणार्या त्रासाबाबत प्रयागराजच्या पोलीस महानिरीक्षकांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी चार जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू संगीता श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. कुलगुरू संगीता श्रीवास्तव यांनी ही तक्रार दाखल केली आणि पहाटेच्या वेळी मशिदींमध्ये लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली.
त्यानंतरच पोलीस महानिरीक्षकांनी हे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरचा वापरही या बंदीखाली येईल. प्रयागराज परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना पत्रात महारीक्षक पी.पी. सिंह म्हणाले आहेत की, सर्वोच्च न्यायालयाने आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेले आदेश अधिकाऱ्यांनी लागू करावेत. रात्री १० ते सकाळी ६ वाजताच्या दरम्यान लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी व पोलीस प्रमुखांना पत्रात देण्यात आले आहेत.
कुलगुरू संगीता श्रीवास्तव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, लाऊडस्पीकरवर होणाऱ्या अजानमुळे वेळेच्या आधी झोपेतून उठण्याची त्यांना सक्ती केली जात आहे. यामुळे त्यांच्या डोक्यात वेदना होते आणि त्यांच्या कार्यावर परिणाम होतो. संगीता श्रीवास्तव यांनी ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी भानुचंद्र गोस्वामी यांच्याकडे ही तक्रार केली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला