खोया… पाया !

Khoya Paya

हाय फ्रेंड्स ! एका अभ्यासानुसार देशात जवळपास 80 हजार मुले दरसाल हरवतात. तीन पैकी दोन कधीच सापडत नाही. ही संख्या हरवलेल्याच्या नोंदीवर आधारित आहे. परंतु लाखो मुले अशीही आहे की ज्यांच्या हरवल्याची कुठेही नोंद नाही. या हरवलेल्या मुलांची नोंद सहसा पोलिसांकडे केली जाते. चाइल्डलाइन सारख्या संस्थांकडे ही त्यांची माहिती येते. भारत सरकार व चाईल्ड लाईन इंडिया यांनी मिळून “खोया – पाया ” हे ॲप विकसित केलेले आहे. इतरही अनेक अशा सुविधा उपलब्ध आहे.

या विषयाची आठवण येण्याचे कारण म्हणजे आम्हां मैत्रिणीची एक ट्रीप. दोन वर्षांपूर्वी प्रकल्प भेटीच्या निमित्ताने पुण्यातील शोभाताई भागवत, डॉक्टर अनुराधा सहस्रबुद्धे, डॉक्टर सोनवणे यासारख्या भव्य काम करणाऱ्या व्यक्तीशी ओळख चर्चा आणि अनुभव ऐकणे झाले. खरं तर आपण मुले म्हणजे देवाघरची फुले वगैरे म्हणतो, त्यांना जपतो, परंतु “ज्ञानदेवी चाइल्डलाइन” चालवणाऱ्या आणि वस्तीतील मुलांसाठी संस्कार वर्ग चालवणाऱ्या डॉक्टर अनुराधा ताईंचे अनुभव थरकाप उडवणारे होते. अशा प्रकारची कामे करताना किती खंबीरपणे करावी लागतात, याचा अनुभव त्यांच्या बोलण्यातून जाणवला.

फ्रेंड्स ! बरेचदा आपण मुले हरवली आहेत असे ऐकतो .पण बरीचशी मुले हरवलेली, एकतर ती पळवलेली किंवा पळून गेलेली असतात. बालकामगार/ वेठबिगार , भीक मागण्यासाठी वेश्यावृत्तिसाठी, अवयव चोरण्यासाठी सुद्धा मुले पळविल्याचे अनेक अभ्यासातून दिसते. ही मुले पळवलेली असतात. कितीही प्रयत्नानंतर त्यांनाघरी पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी पळून जातात, काही पालकच हाकलून देतात. कारण त्यांच्या या पळपुट्या मनोवृत्तीला पालकही कंटाळलेले असतात असे अनुभव डॉक्टर अनुराधाताई सांगत होत्या.

मुले त्यांचे बालपण त्यांच्यासाठी खस्ता खाणारे पालक ,आईला सोडून शाळेत जायचे नाही या सेप्रेशन अन्झायटीने रडणारी मुले, दिवसभर कुठेही राहिला तरी ,रात्री ह्याला आई जवळच लागते. अशी होणारी बाळाची लाड कौतुक, हे झेलणारी मुले, आणि या पार्श्वभूमीवर अशी मुलासाठी केलेल्या निवाऱ्यातही न टिकणारी पळपुटी मुले !परतीच्या प्रवासात माझ्या मनात त्या मुलांचाच विषय सुरू होता. असं काय कारण असेल की त्यांना पळून जावं असं वाटत असेल? किंवा कशाचे आकर्षण त्यांना घरकुला पासून बाहेर खेचत असेल ? हा प्रश्न मला छळत होता.

त्यावर थोडे वाचन केल्यावर आणि काही निरीक्षणानंतर ,अनुभवानंतर काही गोष्टींचा उलगडा झाला. या मुलांचे बरेसचे रोल मॉडेल्स असतात. किंवा चित्रपटासारख्या माध्यमातून त्यांना चमकायच असतं. कुठल्यातरी खेळाचा मोठा खेळाडू बनायचं असतं. मग तो खेळ खेळण्यासाठी आणि आवडत्या खेळाडूला भेटायला किंवा पिक्चर मधल्या हिरोना बघायला, भेटायला ही मुले शहराकडे धाव घेतात. आणि मुंबईच्या झगमगाटामध्ये हरवतात . आणि मग रस्ता सापडत नाही. बे वारसा सारखी फिरत राहतात.

एक नवीनच गोष्ट म्हणजे ही मुले स्वतःलाच हरवून घेतात. ऐकायला हे विचित्र वाटते. पण घरी पोहोचवली तरी तिथे ती टिकून राहात नाही .खूप मनधरणी करूनही घरी जात नाही. त्याला कारणेही तेवढीच तीव्र असतात .ज्यामुळे ती मुले प्रेम न मिळता दुखावली जातात ते घाव खूप खोलवर असतात. बरेचदा कौटुंबिक कलहाला कंटाळून तर कधी शारीरिक व लैंगिक अत्याचाराला घाबरून तसेच गरिबी ,भूकमारी यानेही ते घर सोडतात आणि मग हळूहळू स्वातंत्र्याची मोकळ्या आयुष्याची सवयच लागून जाते. मग नशीब नेईल तिकडे भरकटतात , असामाजिक तत्त्वांना बळी पडू शकतात.

मानसशास्त्रीय दृष्ट्या घरातून पळून जाणार याची काही लक्षणे दिसतात का ? याचा विचार केल्यानंतर काही लक्षणे जाणवतात. जास्त वेळ घराबाहेर राहणे ,घरी येण्यासाठी टाळाटाळ करणे, मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी जास्त राहणे, शाळेत जायचे निमित्य सांगून बाहेरच फिरत राहणे, वागणुकीमधील बदल किंवा वाढलेली आक्रमकता ,एकेकटे राहणे सगळ्यांपासून स्वतःला तोडून घेणे, खोटे बोलणे, व्यसन करणे, आत्मकेंद्रित होणे, संवाद टाळणे इ.

ही मुले पळून जातात, त्यामागच्या कारणांचा थोडासा आढावा घेतल्यास आई-वडिलांचा घटस्फोट, सावत्र पालकाचे आगमन, मायेच्या घरातल्या व्यक्तीचा मृत्यू ,गरिबी, व्यसनी आई-बाप याशिवाय लैगिक शोषण अथवा मारहाण, शिवीगाळ किंवा डोळ्यासमोर होणारा आईचा छळ सहन न झाल्याने किंवा हट्ट न पुरविल्या गेल्याने ते घर सोडतात. घरात लैंगिक शोषण होत असते, पण सांगायचे कसे? आणि सांगितले तरी विश्वास कोणी ठेवत नाही हे सहन न होऊन मुले पळून जातात.

वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये वैचारिक अंतर पडून होणारी भांडणे, रागाच्या भरात किंवा नैराश्यातून केवळ मित्रांच्या आग्रहाला बळी पडून ,किंवा थ्रील म्हणून पौगडावस्थेतील मुले बाहेर पडतात.

लग्नाबद्दल कल्पना खूप असतात. नको असलेल्या मुलाशी लग्न ठरवणे, प्रेम प्रकरणांमुळे फेसबुक मित्रांच्या भूलथापांना बळी पडून, अवैध मानवी वाहतूक करणाऱ्यांच्या हाती लागून. अशा अनेक गोष्टींमुळे गैरफायदा घेणारे लोक आहेत .प्रेमाचे दोन गोड शब्द ,थोडेसे प्रेम ,भेटी यालाच मुली प्रेम समजतात आणि भाळतात . घरात दूजाभाव, प्रेमाचा पूर्ण अभाव, अशा वातावरणामुळे बाहेर पडलेले आणि परतीच्या वाटाही बंद होऊन गेलेली ही मुले ! पालकांकडून अति अपेक्षा किंवा ताणाचे वातावरण, अशामुळे एक थ्रील म्हणून मुली -मुली, मैत्रिणी- मैत्रिणी पळून जातात. काही अगदी छोटी मुले, आई वडिलांचा हात सुटून म्हणजे ते गप्पा किंवा मोबाईल मध्ये गुंतल्याने, हरवतात देखील !

आपल्या मुलांशी शाब्दिक आणि शब्दांपलीकडचं संवाद असेल तर, पुढील विपरीत परिणाम कळू शकतात. पालकांनी कायमच या बाबतीत काळजी घ्यायला हवी. लहानपणापासूनच या सगळ्या विषयांची घरात एकत्र चर्चा होणे किंवा घरच्या प्रेमळ वातावरणाची नेहमी ऊब वाटेल, विश्वास वाटेल, काही वाटेल ते झालं तरी घर माझ्यासाठी कुशीत घ्यायला तयार आहे हे मुलांना लक्षात आलं तर असे प्रसंग येणारच नाहीत.

लहान मुलाला त्याचे नाव, पत्ता, फोन नंबर आजकाल सगळे शिकवतात .त्याशिवाय शाळेतून जाता-येताना आयकार्ड गळ्यात ठेवण्याची आठवण मुलांना द्यायला पाहिजे. आणि थोडे पैसे जर बरोबर असले ,तर हरवले असल्यास रिक्षा करून घरी यायला सांगावे. भारतभरातील अनेक शहरांमध्ये चाईल्ड लाईन उपलब्ध आहेत त्यामुळे १०९८ या नंबर वर फुकट फोन करून मदत मागता येते. 100 नंबर हे मदत करतो. त्याचप्रमाणे मायक्रो चिप चा ताइत हा मार्ग आधुनिक काळामध्ये सुचव ला जातो.

फ्रेंड्स ! परंतु घरातील वातावरणामुळे ही वेळ येवूच नये, ही काळजी घराघरातून आपण घेऊ शकतो. शेवटी सगळ्या गोष्टींपेक्षा घराचे घरपण टिकलेले रहाणे ही घरातील सर्व जाणत्या लोकांची प्राथमिकता असायला पाहिजे. त्याला पर्याय नाही.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER