लोकशाहीवर व काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा असलेला समर्पित नेता गमावला : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat - Rajiv Satav

मुंबई : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंतःकरण पिळवटून टाकणारे आहे. तरुण वयातच देशपातळीवर नावलौकीक कमावलेला, लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला आहे, अशी शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

“खासदार राजीव सातव यांचे काम मी जवळून पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. गरीब, कष्टकरी जनता, तरूण व शेतकऱ्यांचे प्रश्न ते अत्यंत तळमळीने मांडत असत. आपल्या कामाच्या ताकदीवर ते देश पातळीवरच्या राजकारणात पोहचले. आमदार, खासदार म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. समाजिक, राजकीय प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती.” असे तीव्र दुःख बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष व त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे केले. खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाची भूमिका ते भक्कमपणे मांडत असत. कृषी कायद्याला तीव्र विरोध करत राज्यसभेत त्यांनी पक्षाची बाजू समर्थपणे मांडली. त्यांना तीनवेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो. तसेच, सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राजीव तुमची मेहनत, संघर्ष कायम आठवणीत राहील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button