संकटातून संधीचा मार्ग दाखविणारे प्रभू श्रीराम 

Shri Ram

श्रीरामायण आजही आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान आहे. ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने महर्षी वाल्मिकींकडून रामायणाची रचना होते आणि ‘मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या’ मंगल चारित्र्याचा अमृतकलश आपल्या हातात येतो. त्यातील अमृताचे रसपान  करत आपण सुखावतो, कधी हळहळतो, तर कधी त्वेषाने पेटून उठतो आणि नतमस्तकही होतो, हीच या काव्याची उपलब्धी आहे.

भारताच्या दशदिशा श्रीरामकथेच्या अमृतकुंभातील आदर्शाच्या अमृताचा आस्वाद घेत याच अमृतरसाला ‘रामरस’ म्हणत त्याच्या वर्षावात तृप्ततेचा अनुभव घेत असतात. आपल्याला रामकथा माहित असूनही ती पुन्हा पुन्हा वाचण्याचा, ऐकण्याचा मोह आपण आवरू शकत नाही हीच या कथेची आणि वाल्मिकींच्या प्रतिभेची महती आहे.

प्रभू रामाचे चरित्र आदर्शाच्या हिमालयावर आणि त्यागाच्या मेरूपर्वतावर उभे आहे. या चरित्राची व्याप्ती क्षितिजासारखी अमर्याद आहे.

भक्तीमार्गाहून मुक्तीमार्गाची ओढ लागलेल्या फक्त वृद्धांसाठी रामायण आहे असा गैरसमज कोणीही करू नये. संस्कारक्षम वयात योग्य संस्कारासाठी, व्यवस्थापनाचे धडे गिरविणाऱ्यांसाठी, सामाजिक ऐक्य एकोपा कसा वृद्धिंगत करावे हे समजण्यासाठी, तिमिरातून तेजाकडे जाण्यासाठी श्रीरामायण उपयुक्त आहे.

श्रीराम  विष्णूचा अवतार असले तरी मनुष्य रूपात असल्यामुळे त्यांच्यावर अनेक संकटे आली पण दृढनिश्चयाने आयुष्यात आलेल्या संकटांवर विजय मिळवून, संकटे जीवनाचा भाग असतात, न डगमगता त्यांना तोंड  दिल्यास मार्ग सापडतोच याची शिकवण दिली. म्हणूनच श्रीराम अनुकरणीय आहेत. “आदर्शाचा आदर्श” म्हणजे “श्रीराम”.

दशरथ राजा आता वृध्दापकाळाकडे झुकत होते. सर्वगुणसंपन्न श्रीरामाला राज्याभिषेक करावा असे दशरथाला वाटले  श्रीरामांवर रामाला युवराजपदाचा अभिषेक होणार ही बातमी मंथरा या  कैकयीच्या दासीला कळते. रामाला होणारा युवराजपदाचा अभिषेक कैकयीसाठी घातक आहे असे मंथरा सांगण्याचा प्रयत्न करते तेन्ह्वा  एका वराने भरतास राज्य आणि दुसऱ्या वराने रामास चौदा वर्ष वनवास! आपल्या आजूबाजूला मंथरेसारखे बुद्धीभेद करणारे असतात पण त्यांच्या कह्यात जाणे आपण टाळावयास हवे.  श्रीरामांना ही हकीकत कळताच पितृवचन पूर्ण करण्यासाठी ते वनात जाण्याचा निश्चय करतात.

पितृवचन पूर्ण करण्यासाठी न डगमगता श्रीराम त्याग करून वनवासात जाण्यासाठी त्वरित सिद्ध होतात.अशा पितृभाक्तीचे दुसरे उदाहरण सापडणे कठीणच.

आपल्याला राज्य प्राप्त होण्यासाठी आईने कुटील कारस्थान रचले हे कळताच भरत   कैकयीचा धिक्कार करतो. आजच्या युगात राज्यासाठी कोणत्या थराला जातात हे पाहिल्यानंतर भरताप्रती आदर शतगुणित होतो. राज्य मिळून ते नाकारणारा भरत श्रेष्ठ की सर्वस्वाचा त्याग करून वडीलबंधू समवेत वनवास स्वीकारणारा लक्ष्मण श्रेष्ठ ही तुलनाच करण अशक्य आहे, आपण या त्यागापुढे फक्त नतमस्तक व्हावं, या त्यागानं दिपून जावं.

वनवासात सीतेचे रावण अपहरण करतो, अश्या वेळेस न  डगमगता श्रीराम सामान्य भासणाऱ्या वानरांना हाताशी धरून सोतेच्या सुटकेची योजना आखतात. संकटांना न डगमगता हाती असलेल्या साधनामधून कार्यभाग साधता येतो हे श्रीरामांनी दाखवून दिले आहे.  सीतेची सुटका करण्यासाठी सुग्रीवाच्या विशाल वानरसेनेसह श्रीराम-लक्ष्मण समुद्रकिनारी पोहचतात. लंकेमध्ये श्रीरामांसमोर वानरसेनेसह समुद्र उल्लंघन कसे करायचे हा यक्षप्रश्न उभा राहतो तीन दिवसांच्या   प्रार्थनेनंतर  सागर प्रसन्न होत नाही हे पाहून श्रीराम धनुष्यावर बाण सोडायला प्रत्यंचा ताणतात, तो सागरातील जीव तळमळू लागतात. धरणीकंपायमान होते आणि सागर देवता प्रत्यक्ष प्रगट होते. श्रीरामांच्या वानरसेनेत नल आणि निल हे विश्वकर्मांचे पुत्र असतात. ते सेतू बंधन करतील असे सागर श्रीरामांना सांगतो. असंख्य वानरवीर सेतुबंधनाच्या कामात मदत करतात. 100 योजने लांबीचा सेतु तयार होतो.

श्रीराम नेते होते.आपल्या नेतृत्वात त्यांनी सामान्य वानरांकडून सेतुबंधन,राक्षसांचा पराभव हे असामान्य कार्ये करून घेतली आणि सामान्यांनी  मनात आणले तर असामान्य कार्ये करू शकतात हे जगाला दाखवून दिले.

रावण हा तपस्वी विश्राव्याचा याचा पुत्र, त्याने उग्र तपश्चर्येने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून, स्वतःला गरुड, यक्ष, दैत्य दानव, देव यांच्याकडून मृत्यू येणार नाही असा वर मागून घेतला होता. वराने उन्मत्त होऊन त्याने पृथ्वीवर हाहाकार माजविला. कुबेराचा पराजय करून त्याने सोन्याची लंका जिंकून घेतली. रावणाने अनेक स्त्रियांचे बलात्काराने अपहरण केले होते. अनेक राज्यांचा पराभव केला एवढेच नव्हे तर अनेक देवांचा पराजय करून त्यांना बंदी गेले होते.रावणाच्या नेतृत्वात राक्षस ऋषी-मुनीना त्रास देत. देवांचा राजा इंद्र यांचाही रावणाने पराभव केला होता. अनेक युद्धात जय मिळाल्यामुळे तो अहंकारी आणि गर्विष्ठ झाला होता. राम रावण युद्ध हे चांगल्या प्रवृत्ती आणि वाईट प्रवृत्ती या मधील युद्ध आहे राम-रावणाचे घनघोर युद्ध होते प्रभू श्रीरामचंद्र रावणाचा वध करतात दृष्ट प्रवृत्ती वर सत प्रवृत्तींचा विजय होतो. अहंकारी रावणाचा शेवट होतो म्हणून आकाशातून देव पुष्प वृष्टी  करतात.

श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण बिभीषण यास  लंकेच्या राज्यपदाचा अभिषेक करतो. श्रीराम, लक्ष्मण, सीता पुष्पक विमानातून अयोध्येस परत येतात. अयोध्येची जनता अत्यानंदित  होते, डोळ्यात  प्राण आणून ते श्रीरामांना पाहतात तेव्हा  लक्षावधी डोळे श्रीरामांना ओवाळत आहेत  असे वाटते. श्रीरामांना राज्याभिषेक करण्यात येतो, रामराज्याची सुरुवात होते.

आपल्या भूभागावर रामराज्य यावं असं प्रत्येकाला वाटतं पण आपणही अयोध्यावासीयांसारखे होण्यास तयार नसतो. हक्काला कर्तव्याची जोड दिल्यास, समर्पण वृत्ती ठेवल्यास आपणही रामराज्याचा अनुभव घेऊ शकतो. आपणही श्रीरामासारखा “विवेक” अंगी रुजविण्याचा प्रयत्न करू.

लेखक : डॉ.भूषण फडके,अकोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button