सनी देओलकडून भगवान शंकराचा अपमान; कॉंग्रेस आक्रमक

Sunny Eeol-Insulted Lord Shankar

नवी दिल्ली :- अभिनेता आणि भाजपचे उमेदवार सनी देओल यांच्याकडून भगवान शंकराचा अपमान झाल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. भगवान शंकर यांच्या प्रतिमेवर अनवधानाने पाय देणं सनी देओलला महागात पडणार असे दिसत आहे. गुरुदासपूरमध्ये रोड शो दरम्यान सनी देओल ट्रकवर बसले असताना नजरचुकीने सनीचा पाय भगवान शंकराच्या फोटोवर पडल्याचं दिसत आहे. यावेळी सनी देओलसह अनेक भाजप कार्यकर्ते ट्रकच्या टपावर बसले होते.

ट्रकच्या समोरच्या बाजूला भगवान शंकर यांचा फोटो होता. सनीचे पाय भगवान शंकराच्या तसबिरीला लागल्याचं फोटोत दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार अश्वनी सेखडी यांनी सनी देओलच्या पुतळ्याची जाळपोळ करून निषेध नोंदवला आहे. त्यानंतर पोलिसांनी येत्या ४८ तासांत प्रकरणाचा तपास करून सनीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. यावर सनी देओलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.