
पुण्याचा गणेशोत्सव, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातलं लोकांना ब्रिटिशांविरुद्ध एकत्र आणणारं प्रभावी माध्यम. स्वातंत्र्योत्तर काळात स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी कार्यरत असलेला प्रमुख उत्सव. म्हणूनच तर १९५०पासून ते अगदी आत्तापर्यंत सार्वजनिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही नाव कमावलेल्या प्रथितयश अशा अनेकांच्या सार्वजनिक, लोकाभिमुख कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली ती गणेशोत्सवाच्या कामामधून.
त्यामुळंच महापूर असो की भूकंप, गणेशोत्सवाचे कार्यकर्ते जमेल त्या प्रकारानं संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जातात, हे चित्र पुण्यानं, महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलं आहे. कोरोना रोगाचं संकटही त्याला अपवाद नाही. पुण्यामध्ये अन्नदान, रुग्णसेवा, ज्येठ नागरिकांची वा रुग्णांची रुग्णालयात घरी ने-आण, निवाऱ्याची सोय असो की पन्नास-साठ किलोमीटरवरच्या गर्भवतीला अत्यावश्यक मदत पोचवणं असो, पुण्याच्या गणेशोत्सवातले कार्यकर्ते एकूण मदतकार्यात पन्नास टक्क्यांहून जास्ती प्रमाणात आहेत, हे वास्तव आहे.
त्यामुळंच कोरोनाचं संकट लांबणार आहे आणि आणखी काही काळ तरी कोरोनासह जगावं लागणार आहे, या वास्तवाची जाणीव प्रत्यक्ष देशाच्या पंतप्रधानांनीच करून दिल्यानंतर गणेश मंडळं प्रतिसाद दिल्याशिवाय थोडीच राहणार… पुण्यातल्या प्रमुख गणेश मंडळांच्या काल झालेल्या सोशल मीडियावरून झालेल्या बैठकीत यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करावा, हे ठरवण्यात आलंय. ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी या दोन मंडळांसह गुरुजी तालीम, तुळशीबाग मंडळ आणि केसरीवाडा या मानाच्या पाच गणपतींसह पुण्याच्या गणेशोत्सवाचं आकर्षण असलेल्या दगडूशेठ हलवाई आणि मंडई मंडळ तसंच भाऊ रंगारींचं सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा करणारं मंडळ या आठही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाचा उत्सव साधेपणानं साजरा करण्यासाठी सहमती दर्शवलीय.
मूर्तिकारांना आणि मंडळांनाही एक आवाहन करण्यात आलंय की, मूर्तीला मास्क घातलाय, अशा प्रकारची मूर्ती वा सजावट करू नये आणि मूर्तीचं पावित्र्य घालवू नये. गणपती हा विघ्नहर्ता देव आहे आणि गणांचा अधिपती असल्यानं उत्सवाला हौशे, गवशे, नवशे अशा सर्वांचीच गर्दी होते. त्यामुळं ती टाळून साधेपणानं उत्सव होणार आहे. गर्दी करून सोशल डिस्टन्सिंग न पाळता उत्सव साजरा केला तर विघ्नहर्त्या गणेशालाही ते पटणार नाही. त्यामुळं प्रमुख गणेश मंडळांचा हा निर्णय स्वागतार्हच आहे. पण कालची बैठक प्राथमिक होती आणि गणेशोत्सवाला काही अवधी आहे. त्यामुळे परिस्थितीनुरूप योग्य तो निर्णय होईल; पण आज तरी हा निर्णय योग्यच आहे, असे म्हणावे लागेल.
कोरोना सुरू झाल्यापासून रामनवमी असो, महावीर जयंती असो की रमजानचा महिना, आंबेडकर जयंती असो की बुद्धपौर्णिमा सर्वच धर्मांच्या नागरिकांनी, लोकोत्तर पुरुषांच्या अनुयायांनी संयम पाळून कोरोनाशी लढण्यासाठी गर्दी करणं टाळलं आहे. आपला उत्सव साजरा करत असताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतलेली दिसतेय. काही अपवाद असूही शकतील; पण लार्जर पब्लिक इंटरेस्ट वा सामायिक जनहित लक्षात घ्यायलाच हवं. त्या दृष्टीनं विघ्नहर्ता गणपती हा सुखकर्ता म्हणूनही प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव येत असल्यानं सुखकर्ता विघ्न हरेल आणि कोरोनाला घालवेल, अशी प्रार्थना विघ्नहर्त्याला सुखकर्त्याला करू या; पण तीही आपापल्या घरात बसूनच…
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला