लॉकडाऊनचा गैरफायदा घेत चिपळूणच्या भाजी विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात आठ दिवसांसाठी जाहीर झालेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेत चिपळुणातील काही भाजी व्यापाऱ्यांनी घेऊन ग्राहकांना दामदुप्पट किमतीसह निकृष्ट दर्जाची भाजी विकली आहे. दिनांक १ ते ८ जुलै दरम्यान जिल्ह्यात प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊन दोन दिवसांपूर्वी जाहीर झाले होते. परिणामी ग्राहक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येऊ लागले. सोमवारी बाजारपेठ बंद असल्याने ग्राहकांना खरेदी करता आली नाही. मात्र, मंगळवारी बाजारपेठ उघडल्यावर प्रचंड गर्दी झाली.

ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनी आठ ते दहा दिवसांचा साठा होईल अशा जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने किराणा, औषधे व भाजी फळे यांचा समावेश होता. ग्राहकांची झालेली गर्दी आणि पुढील आठ दिवसांचा लॉकडाऊन याचा गैरफायदा घेऊन शहरातील काही भाजी विक्रेत्यांनी ग्राहकांना टाकाऊ व निकृष्ट दर्जाची भाजी विकली.

तसेच भाजीच्या दरातही तिपटीने वाढ करण्यात आली. ४० रूपयांची भाजी १०० हून अधिक दराने विकण्यात आली. सायंकाळी पाच वाजल्यानंतर काही विक्रेत्यांकडे भाजी शिल्लक राहिली नाही तर बाजारपेठेत अनेक दुकानातून दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याने दूध देखील शिल्लक राहिले नाही. लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन विक्रेत्यांनी ग्राहकांची लूट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER