टेनिसचा सामना चालला तब्बल सहा तास, इटलीच्या गिस्टिनोने मारली बाजी

Lorenzo Giustino

आयपीएलचा (IPL) सामना चालतो सव्वातीन तास आणि अलीकडेच फ्रेंच ओपन टेनिस (French Open Tennis) स्पर्धेत एक सामना चालला तब्बल सहा तास पाच मिनीटं. म्हणजे आयपीएलच्या सामन्याच्या दुप्पट. क्रिकेटच्या सामन्यात मैदानावर खेळाडू असतात 11+2 आणि टेनीसच्या सामन्यात असतात फक्त दोन. तेसुध्दा प्रतिस्पर्धी म्हणजे ते दोघे सतत खेळत असतात. विश्रांती अशी गोष्ट नसते. तर विचार करा, सहा तास पाच मिनिटे हा सामना चालला. त्यातले खेळाडूसुध्दा काही फारसे अनुभवी नव्हते, नावाजलेले नव्हते आणि त्यात पात्रता फेरितून मेन ड्रॉमध्ये आलेल्या इटलीच्या (Italy) लाॕरेन्झो गिस्टिनो (Laurenzo Guistino) याने विजय मिळवला. त्याने फ्रान्सच्या कोरेन्टीन मौटेट ह्याला 0-6, 7-6(7), 7-6(3), 3-6,18-16 अशी मात दिली. हा सामना एवढा लांबला की त्यादिवशीचे इतर सामने मध्यरात्रीनंतरही खेळावे लागले.

सहा तास पाच मिनिटे एवढा प्रदीर्घ खेळ होऊनही हा सामना फ्रेंच ओपनमधील सर्वात जास्त काळ चाललेला सामना मात्र नव्हता. तो विक्रम 2004 मध्ये फॕब्रिस संतारोने अर्नाड क्लेमेंटवर 2004 मध्ये मिळवलेल्या विजयाचा आहे मात्र त्यासाठी त्याला तब्बल सहा तास 33 मिनीटे वेळ लागला होता. त्यानंतर फ्रेंच ओपनमधला हाच सर्वात दीर्घ सामना…आणि ग्रँड स्लॕम स्पर्धेच्या इतिहासातील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना.

गिस्टिनोच्या विजयातील 18-16 हा 34 गेमचा एकच सेट तब्बल तीन तास चालला. फ्रेंच ओपनच्या इतिहासात निर्णायक सेटमध्ये हे सर्वाधिक गेम ठरले. 2012 मध्ये दुसऱ्या फेरीत जाॕन इस्नर व पॉल हेन्री मॕथ्थ्यू यांच्या सामन्यातही शेवटच्या सेटमध्ये एवढेच गेम खेळले गेले होते. शिवाय 2014 च्या ज्युलियन बेनेटो व फाकुंदो बाग्नस यांच्या सामन्यातही शेवटचा सेट एवढ्या गेमचा झाला होता.

2018 च्या विम्बल्डनचा केव्हिन अँडरसन आणि जाॕन इस्नर दरम्यानचा उपांत्य सामना चांगला सहा तास 36 मिनिटे रंगला होता आणि ग्रँड स्लॕम स्पर्धेत सर्वाधिक काळ चाललेल्या सामन्याची वेळ आणि गेम यांची संख्या बघून तर तुम्ही थक्क व्हाल. विम्बल्डन 2010 चा तो सामना थोडथोडका नाही तर तब्बल 11 तास 5 मिनीटे चालला होता. जाॕन इस्नर आणि निकोलस माहुत दरम्यानच्या त्या सामन्यात शेवटचा सेट इस्नरने 70-68 असा जिंकून ती मॕरेथॉनपेक्षाही मॕरेथाॕन लढत एकदाची संपवली होती.

अलीकडचा गिस्टिनोचा हा सामना असो की, आधीचे मॕरेथॉन सामने असोत, एवढा दीर्घकाळ हे सामने का चालले तर टाय ब्रेकरचा नियम नव्हता. आता फ्रेंच ओपन सोडून इतर तीनही ग्रँड स्लॕम स्पर्धात टायब्रेकरचा नियम लागू आहे. आॕस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुषांसाठी पाचव्या किंवा महिलांसाठी तिसऱ्या सेटमध्ये 6-6 स्कोअर असताना दोनच्या फरकाने जो आधी 10 गुणांवर पोहोचतो तो विजेता ठरतो. विम्बल्डनला 12-12 नंतर पारंपारिक फर्स्ट टू सेव्हन – दोनच्या फरकाने असा टायब्रेकर होतो. 2019 पासून या दोन्ही स्पर्धांनी हा नियम लागू केला आहे. युएस ओपनमध्ये 6-6 अशा स्कोअरवर टाय ब्रेक खेळला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER