प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !

Republic Day

भारतीय प्रजासत्ताकाला (Republic Day) आज 71 वर्ष झाली. 26 जानेवारी 1950 यावर्षी स्वतंत्र भारताने, भारतीय संविधानाची अंमलबजावणी केली. प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे सरकार, शासन. लोकशाही सरकारची व्याख्या तर लोकांनी ,लोकांसाठी चालवलेले ,लोकांचे राज्य अशी आपली लोकशाहीची व्याख्या आपण करतो. मग लोकप्रतिनिधींही योग्यतेनुसार निवडायला हवे. म्हणूनच चाणाक्ष राहून व जागरूकतेने आणि शंभर टक्के मतदान करायला हवे .कारण आपले राष्ट्र चालवण्यासाठी निर्माण केलेले संविधानातील घटकांमध्ये, बहुमतातील सरकारला घटना दुरुस्ती करता येते. मग ती योग्य आहे की नाही ? हे समजण्यासाठी भारतीय संविधान काय आहे हे तर आपल्याला कळायला पाहिजे. आपल्यापैकी कोणीही ते वाचले नसते.

आपणच आपल्याला राष्ट्रभक्त समजतो खरे ! पण संविधानाचा अर्थ समजून घेतल्याशिवाय भारत हे राष्ट्र कळत नाही .मग आपले राष्ट्रभक्त होणेच अपुरे नाही का ? आपल्या संविधानाचा मूल्यआशय आपल्या संविधानाच्या सुरुवातीच्या प्रास्ताविकात समावेश होतो. आता शाळेत राष्ट्रगीत व प्रतिज्ञा बरोबरच प्रास्ताविका ही म्हणून घेतले जाते असे ऐकले. राष्ट्र हे सार्वभौम असून स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता प्रत्येक नागरिकास प्राप्त करून देण्याचा निर्धार करतो .ही आहेत या देशाची राष्ट्रीय मूल्य .मात्र या तत्त्वांची अपरिवर्तनीय चौकट संविधानाने स्वीकारलेली आहे .संविधान दुरुस्ती करण्याची तरतूद संविधानात आहे, तरीही या मूलभूत चौकटीशी विसंगत किंवा विरोधी जाणाऱ्या कुठल्याही गोष्टीत किंवा कायदा करण्याचा अधिकार संविधान देत नाही. पण म्हणूनच संविधानाचा जाणीवपूर्वक स्वीकार ही एक गोष्ट असली ,तरीही चमत्कारासारखा बदलही त्यामुळे घडणार नाही. तर समाजातील प्रत्येक घटक त्यानुसार कृतिशील व्हावे लागेल. थोडक्यात काय तर संविधान हा काही आपल्या” कवरेज एरियाच्या बाहेरचा विषय “समजून चालणार नाही, आणि २६ जानेवारी हा केवळ “उत्सव “म्हणून साजरा करूनही चालणार नाही.

संविधानाची निर्मिती प्रक्रिया कशी झाली ? तर 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभा स्थापन झाली. या सभेमध्ये 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिला प्रस्ताव अर्थात संविधानाचा उद्देश या आपल्या सभेपुढे मांडला. अनेक मूलभूत मुद्यांसह त्यांनी संविधानाचे चित्र स्पष्ट केले .पुढे संविधान निर्मितीचे काम सुरू असताना मसुद्याच्या दुसऱ्या वाचनानंतर संविधानाच्या प्रास्ताविका, चर्चा चालू झाली. तेव्हा या मूल्यांचा प्रास्ताविकात समावेश झाला. त्यामध्ये अनेक सूचनाही आल्या. उदाहरणार्थ- देवाच्या नावाने संविधान ची सुरुवात करावी, किंवा महात्मा गांधींना अर्पण करावे वगैरे. परंतु या सूचना फेटाळून लावण्यात आले आणि आज संविधानाची सुरुवात ही”आम्ही भारतीय लोक” अशी करण्यात येते. स्वतःलाच अर्पण केलेले हे संविधान. या सगळ्या चर्चेला योग्य दिशा देण्याचे ,सूचनांवर मत आणि शंकांना उत्तरे देण्याचे काम ,संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

दुसरा मुद्दा म्हणजे भारतातील संविधान सभेचे मधील सदस्यांपैकी फक्त 15 महिला होत्या. टक्केवारी मध्ये चार किंवा पाच टक्के. त्यात दलित मुस्लिम व ख्रिस्ती महिला प्रत्येकी एक आणि आदिवासी एकही नाही. मसुदा समितीत तर एकही स्त्री नव्हती. समाजातील लोकसंख्येच्या अर्ध्या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्याचा देशाच्या भविष्यात नकाशा निश्चित करण्यात अल्प वाटा होता. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या स्त्रिया उच्चशिक्षित स्वयंप्रज्ञ स्वतःच्या जात ,धर्म ,वर्ग, स्तरांतील संकेतांना ठोकण्याची जिद्द बाळगणार्‍या, पारतंत्र्य विरोधी लढतांना तुरुंगवास भोगलेल्या अशा आहेत. अम्मू स्वामीनाथन, दाक्षायणी वेलायुधन, बेगम ऐजाज रसूल, दुर्गाबाई देशमुख, अनी मस्कारेन, रेणुका रे, कमला चौधरी, राजकुमारी अमृत कौर, यासारख्या या सर्व महिलांनी आपल्या महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. त्यांना स्वतंत्र मतदार संघ ,राखीव जागा अपेक्षित नव्हत्या .तर आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, नैतिक दृष्ट्या संरक्षण कवच देणाऱ्या संरचनात्मक बदल त्यांना हवे होते. अल्पसंख्याकांसाठी वेगळ्या मतदारसंघ त्यांना मुळीच नको होते .कारण अल्पसंख्य बहुसंख्यअंकांपासून कायमस्वरूपी वेगळे पडतील. मुख्य म्हणजे त्यांना राजकीय आरक्षणही नको होते .कुठल्याही अग्रक्रमांची मागणी पण त्यांची नव्हती .केवळ सामाजिक ,आर्थिक आणि राजकीय न्याय या प्रकारची समता त्यांना अपेक्षित होती. ज्यांचा पाया हा आदर आणि सामंजस्य हा होता.

हे संविधानातील पायाभूत मूल्य रुजून सशक्त समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे .आणि आजूबाजूला बघितल्यावर असे प्रयत्न काही लोक करत असल्याचेही लक्षात येते .बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्त्रीयांना उभे केले जाते, पण फक्त पद बाईच्या नावाने आणि काम नवरा करत असतो. परंतु प्रत्येक महिलेला आपले हक्क कळायला पाहिजे, राजकारणात यावं असं वाटायला पाहिजे म्हणून संविधान खूप महत्त्वाचा आहे ,यासाठी २०१८ पासून संविधानाचे मौलिक अधिकार या विषयावर शालू तिरपुडे या जागृती मोहीम राबवत आहेत, आज पर्यंत पाचशे ते सातशे गावांना भेटी देऊन ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या राजकारणात सत्तास्थानी महिला का यावी ? कशी यावी ? पद कसे सांभाळावे यासंबंधीचे मौलिक मार्गदर्शन त्या
करतात .

त्याचप्रमाणे संविधानाची प्रास्ताविका समजून घेऊन त्याला अनुरूप असा भारत घडवण्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी असायला पाहिजे. संविधानातील मूल्य समजून घ्यायला पाहिजे . यासाठी संविधानाचे महत्त्व पोवाड्यातून समजावून सांगण्याचे एक महत्त्वाचे कार्य सुनील स्वामी नावाच्या कार्यकर्त्याने हाती घेतले आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य चालते.

या कार्यात आपलाही हातभार लागायला हवा असे प्रत्येकाला वाटायला हवे आणि त्याची सुरुवात स्वतः सर्वप्रथम संविधान समजून घेणे, त्याचे वाचन करणे आणि मनन करणे, आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या स्वता:च्या एक नागरिक म्हणून जबाबदाऱ्या काय हे ओळखायला आपल्याला मदत होईल .

तसेच व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य आपल्यात येऊ शकेल आणि ती सुरुवात स्वतःपासून करायला हवी .त्याचप्रमाणे स्वातंत्र्य ,समता ,बंधुता ,आणि न्याय ही मूल्य आहेत .त्याच्याच बरोबर अहिंसा या मूल्याची पण इथे तितकीच गरज आहे. लोकशाहीत फक्त हक्कांची मागणी करून चालणार नाही तर आपल्या कर्तव्यापुरती दक्ष राहावे लागते हे जेव्हा सगळ्यांना जाणवेल तेव्हाच खरा प्रजातंत्र दिन साजरा होईल. सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !!!.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER