पवारांना प्रदीर्घ अनुभव; त्यांच्या सूचनांचे महत्त्व मुख्यमंत्र्यांनी ठरवावे- फडणवीस

नवी मुंबई :- वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एमएमआर क्षेत्रातील कोविड-१९च्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ नसल्याचे सांगितले. खरं पाहता कोरोना काळात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यक्ता आहे. पण तसं दिसून येत नाही. किमान निर्णयप्रक्रियेतून तरी तसं पुढे यायला हवं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते आम्हाला अनेक वेळा सूचना करायचे. त्याचप्रमाणे सरकारलाही ते सूचना करत असतील. त्यामुळे त्या सूचनांची अंमलबजावणी कशी करायची हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : संख्येकडे नाही तर रुग्णांच्या व्यवस्थापनावर लक्ष द्या – देवेंद्र फडणवीस

मागील महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा दुपटीचा दर वाढत आहे. त्यामुळे शासकीय व्यवस्थेमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे रुग्णांना जास्तीचे पैसे खर्च करून खासगी रुग्णालयात उपचार करावा लागत आहे. त्या ठिकाणी त्यांना मोठे दर द्यावे लागत आहे. सर्वसामान्यांना ते दर खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे सर्वांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. सोबतच जनरल हॉस्पिटल कोविडसाठी असल्यामुळे आता नॉनकोविडलासुद्धा आरोग्य सुविधा मिळायला हवी. सध्या टेस्टिंगचे प्रमाण प्रचंड कमी आहे. कोरोना संक्रमणाचा दर हा ३० टक्के आहे. त्याचा अर्थ आता टेस्टिंगची मोठ्या प्रमाणात गरज आहे. जर टेस्टिंग वाढवलं नाही तर संक्रमण वाढत जाईल, अशी भीतीही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. आयसीएमआरने टेस्टिंग झालं पाहिजे, अशी सूचना केली आहे. तसेच नवी मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केटमध्ये रॅपिड टेस्टिंग करा, अशी मागणी फडणवीसांनी केली. येत्या काळात अधिक आयसीयू आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करावे लागतील. शासनाकडून खरेदीची प्रक्रिया अत्यंत मंद गतीने सुरू आहे, ती वेगाने केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : अजित दादांच्या दबावापुढे ठाकरे सरकारवर दोन किलोमीटरचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की

आयुक्तांच्या बदल्या करणे ही योग्य पद्धत नाही

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त्यांच्या बदल्या करणे ही योग्य पद्धत नाही. या लढाईत सातत्य आवश्यक आहे. सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी आयुक्त बदलत आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री आहेत. मात्र त्यांनासुद्धा आयुक्त बदली करत असताना विश्वासात घेतले गेले नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली.

सरकारतर्फे मंत्र्यांसाठी नव्या गाड्या घेणे ही प्राथमिकता असू शकत नाही. एकीकडे कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत कडक धोरण स्वीकारले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, संपूर्ण कोविडच्या काळात मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांत  विरोधी पक्षाची बैठक बोलावली नाही. त्यातही भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे. त्या पक्षाच्या अध्यक्षांना बोलावले नाही. आमच्यात कोणताही इगो नाही. आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत. जर मदत मागितली नाही तरीही आम्ही मदत करूच; कारण आम्ही जनतेला बांधील आहोत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER